दीपक मोहिते,
ग्रामीण जनतेची दैन्यावस्था,
देवाभाऊ ” अजब तुझे सरकार आणि बेधुंद तुमचा कारभार,”
हिंदीची सक्ती प्रकरणी ठाकरे बंधूनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे फडणवीस सरकार अक्षरशः तोंडावर पडले.मराठी भाषा,आम्ही बोलणार नाही,असे उर्मटपणे बोलणाऱ्या अन्य भाषिकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिल्यानंतर त्याचे अन्य राज्यात जोरदार पडसाद उमटत आहेत.ही आग आता अन्य राज्यातही पसरण्याची शक्यता आहे.सरकारला या प्रश्नी माघार घ्यावी लागल्यामुळे सेना – मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.तर दुसरीकडे विजयी मेळाव्याला मराठी भाषिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपच्या नेत्यांच्या पोटातील जळजळ सतत वाढत आहे.स्था.स्व.संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.मात्र,मराठी व अन्य भाषिकांना एकमेकांसमोर उभे करण्यात सत्ताधारी आपल्या कुटील कारस्थानात यशस्वी झाले आहेत.लोकसभा व विधानसभेसाठी हिंदुत्वाचा व आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी ” भाषेचा अभिमान,” असा अजेंडा राबवणाऱ्यांना आता हात चोळत बसावे लागले आहे.ही स्थिती अत्यंत घातक असून कालांतराने ती अराजकाला आमंत्रण देणारी आहे.

हे सारे रामायण घडत असताना एका वृत्ताने उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.ते धक्कादायक वृत्त काय आहे ते पहा जरा,राज्याच्या ८ हजार २३१ गावांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी शाळाच नाहीत.हिंदी भाषा स्विकारली नाहीतर आपल्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत,त्यांचे भवितव्य अंधारात सापडणार असल्याचा टाहो फोडणाऱ्या आपल्या देवभाऊंचे सरकार आपल्या राज्यातील या परिस्थितीवर ” हाताची घडी,तोंडावर बोट,” अशा भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.आपल्या राज्यातील शिक्षण क्षेत्राची अवस्था आजच्या घडीला ” सांगता येत नाही,सहनही होत नाही,” अशी झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा एकामागोमाग बंद पडत आहेत,विद्यार्थ्यांची वेगाने गळती होत आहे,निरक्षरतेचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते सतत वाढत आहे,शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येचा वेलू गगनावर गेला आहे,सरकारच्या नाकर्तेपणामुळे हजारो शाळा एकशिक्षकी झाल्या आहेत,शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामाला जुंपण्यात येत असते,आश्रमशाळामधील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे,अनेक शाळांच्या वास्तू मोडकळीस आल्या आहेत, अंगणवाड्याना स्वतःच्या वास्तू नाहीत,अंगणवाड्या झाडाखाली भरवण्यात येतात, मध्यान्ह भोजनाचा दर्जा सुमार असतो,यावर उपाययोजना करण्याऐवजी आपले देवाभाऊ हिंदी सक्तीच्या मागे धावत सुटले होते.पण त्यांनी हाती घेतलेला हा अजेंडा मराठी अस्मितेला डीवचणारा व मराठी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारा होता.त्यामुळेच देवाभाऊचे सरकार तोंडावर आपटले.

