दीपक मोहिते,
” निवडणूक रणसंग्राम,”
पालघर जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्या, महायुती आरामात खिश्यात घालणार,
जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक शाखेने नूकताच जाहीर केला आहे.त्यामुळे निवडणुकीचे पडघम लवकरात लवकर वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक शाखेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार १४ जुलै २०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना,टप्पा प्रसिद्ध करणे,
हरकती,सूचना व सुनावणी इ.सोपस्कार याच महिन्यात २८ जुलै रोजी पार पडणार आहे.
अंतिम प्रभाग रचना १८ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक शाखेकडे सादर करणे,
निर्वाचक गण अंतिम अधिसूचना १८ ऑगस्ट रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम प्रसिद्ध झाल्यामुळे राजकीय पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये सरळ लढती होणार आहेत.या लढती प्रामुख्याने भाजप/शिवसेना महायुती व शिवसेना ( उबाठा ) यांच्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे.उर्वरित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प.गट ) राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.गट ) बहुजन विकास आघाडी,या चार पक्षाचे अस्तिव नाममात्र आहे.या चारही पक्षांना गेल्या दोन निवडणुकामध्ये पुरेसे उमेदवार देखील उभे करता आले नव्हते.पक्ष बांधणीकडे या चारही राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी निवडणुकांमध्ये त्यांना कायम धोबीपछाड दिला.त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे फारसे अस्तित्व पाहायला मिळणार
नाही.पालघर,बोईसर या विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे अनुक्रमे राजेंद्र गावित व विलास तरे हे प्रचंड मताधिक्य घेत निवडून आले.बोईसर येथे बविआचे राजेश पाटील यांची पाच वर्षांची कारकीर्द फारशी प्रभावी राहिली नाही.त्याचा जबरदस्त फटका या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला बसला.आजच्या घडीला जिल्ह्यात पक्ष अतिशय क्षीण झाला आहे.विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे विलास तरे यांनी प्रचंड मताधिक्य घेत राजेश पाटील यांचा पराभव केला.त्यामुळे पक्षाच्या मूठभर उरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारची मरगळ आली आहे.ती आजही तशीच कायम आहे.वास्तविक या मतदारसंघात दारुण पराभव झाल्यानंतर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याची गरज होती.पण ते झाले नाही,त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत फारसे वेगळे घडणार नाही.या जिल्ह्यात शरद पवार गट व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ताकद शून्य असून हे दोन्ही पक्ष हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच जागा लढवतील.पण त्यांना यश मिळण्याची सुतराम शक्यता नाही.जिल्ह्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता वसई तलासरी,डहाणू,
विक्रमगड,जव्हार,वाडा,पालघर या सातही तालुक्यात महायुतीचा घोडा चौफेर उधळणार आहे.या जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षात आपले बस्तान बऱ्यापैकी बसवले आहे.त्यामुळे तीन वर्षांपूर्वी पक्षफुटीनंतर अनेक पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या सोबत गेले.आजच्या घडीला त्यांचा पक्ष मजबूत पायावर उभा आहे.भाजप देखील गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात हातपाय पसरत आहे.प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण,यांच्या निवडीमुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजप व शिंदे गट ही जिल्हा परिषद आरामात खिश्यात घालतील,असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

