दिपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
हलाखीचे जीवन जगणारा आमचा अन्नदाता व निर्लज्ज सरकार,
देशाच्या विकासामध्ये शेतकरी व कामगार या दोन वर्गचे फार मोठे योगदान असल्याचे आपण सतत ऐकत असतो.या दोन वर्गापैकी एकाने आपली भूक मिटवली तर दुसऱ्या वर्गाने आपल्या कष्टाने रोजगार निर्मिती केली.त्यामुळे आपला देश कृषीप्रधान व उद्योगशील देश म्हणून ओळखला जाऊ लागला.पण आज हे दोन्ही वर्ग राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे हलाखीचे जीवन जगत आहेत.आज त्यांना कोणीच वाली उरलेले नाही.

दोन दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यात एक शेतकरी त्याच्याकडे बैल नसल्यामुळे स्वतःच्या मानेवर हौद ठेवून नांगरणी करत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले व सरकार खडबडून जागे झाले.अभिनेते सोनू सुद यांनी त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळवला व त्यांनी त्या शेतकऱ्याला मोफत बैलाची जोडी देण्याचे जाहीर केले.त्यानंतर शेतकऱ्यांचे पावलोपावली उपमर्द करणारे आपले कृषिमंत्री माणिकराव राव कोकाटे यांनी त्या शेतकऱ्याशी संपर्क साधला व मदत करण्याचे आश्वासन दिले.अभिनेते सोनू सूद यांनी याविषयी घेतलेला पुढाकार हा नक्कीच कौतुकास्पद होता,त्यानंतर कोकाटे यांना झालेली उपरती,हा एक सरकारी सोपस्कारचा भाग होता.
कृषीक्षेत्रात नवनवीन प्रयोग होत असताना,तसेच शेत लागवडीच्या प्रक्रियेत ट्रॅक्टर व पॉवर टिलर यासारख्या आधुनिक साहित्याचा वापर होत असताना अनेक जिल्ह्यातील शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून शेती करत असेल तर सरकारला लाज वाटायला हवी.
मजुरांची टंचाई,निसर्गाचा लहरीपणा,पावसाचे प्रमाण सतत घटणे व शेती सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था नसणे,आदी कारणामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील शेती क्षेत्र हे ” ओसाड माळरान,” होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी लाकडी नांगराने नांगरणी करत असत.कालांतराने पारंपारिक पद्धतीने नांगरणी करण्याऐवजी ट्रॅक्टर व पॉवर टिलरने करू लागला.पण हे साहित्य खरेदी करणे व त्याचा इंधनखर्च परवडत नसल्यामुळे पुन्हा मागे फिरला.अजूनही अनेक शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेऊन आपल्या शेताची नांगरणी करत असतात.आपल्या शेतकऱ्यांची अवस्था अशी
असेल तर त्याला आपण विकास म्हणायचे का ? त्यामुळे येणाऱ्या काळात आपला अन्नदाता असलेला शेतकरी चित्रकलेच्या पुस्तकात पाहायला मिळणार आहे.” शेतकऱ्यांच्या अंगावरील कपडे,पायातील चपला आमच्या मोदी यांनी दिल्या,” ची किंकाळी फोडणाऱ्या आ.बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटे आपल्या दिशेने आहेत,हे विसरता कामा नये.एकीकडे सरकार निवडणुका जिंकण्यासाठी प्रचारात कर्जमाफीची आश्वासने देत असते.निवडणुका संपताच ” आम्ही असे आश्वासन दिलेच नाही,” असे निर्लज्जपणे सांगत कानावर हात ठेवते तर दुसरीकडे आ.बबन लोणीकर सारखे नतद्रष्ट लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत.अशा सरकारचा व त्यांच्या मंत्री/आमदारांचा निषेध करावा तेवढा थोडाच…

