दिपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
बहुजन विकास आघाडीच्या ७० % नगरसेवकांना या निवडणुकीत धोका होऊ शकतो…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या कामाला वेग आला असून प्रभाग रचनेची कामे लवकरात लवकर हातावेगळी करण्यात येणार आहेत.ती पूर्ण झाली की राज्य निवडणूक आयोगातर्फे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
वसई – विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.२०१५ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ११५ जागांवर लढती झाल्या होत्या.आता होणाऱ्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यामध्ये आणखी काही जागा वाढण्याची शक्यता आहे.
वास्तविक तिसरी सार्वत्रिक निवडणूक ही २०२० मध्ये व्हायला हवी होती.पण कोरोना,त्यानंतर आरक्षण व प्रभागरचनेच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात गेलेले प्रकरण,त्यामुळे या निवडणूका तब्बल पाच वर्षे रखडल्या.या काळात सर्वोच्च न्यायालयाचे धोरण ” तारीख पे तारीख,” असे राहिल्यामुळे,राज्य शासनाने करदात्यावर प्रशासकीय राजवट लादली.सदर प्रकरणी झालेली सततची चालढकल,ही सरकारला फायदेशीर ठरली आहे.नागरी सुविधा देणारी ही यंत्रणा संपूर्णपणे सरकारच्या हाती गेल्यामुळे त्यांना या निवडणुकीत चांगलाच फायदा होऊ शकतो.२०१० ते २०२० दरम्यान या महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची निर्विवाद सत्ता होती.मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना आसपास फिरकूही दिले नाही.त्यामुळे भाजपचा विश्वास दुणावला आहे.कोणत्याही परिस्थितीत या महानगरपालिकेत आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपचे आता प्रयत्न सुरू झाले आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणत्या प्रभागात बहुजन विकास आघाडीला मताधिक्य मिळाले,याविषयी भाजपचे वरिष्ठ नेते सध्या मागोवा घेत आहेत.तसेच गेली अनेक वर्षे ( सुरुवातीस नगरपरिषद व त्यानंतर महानगरपालिका ) सलग निवडून येणारे माजी नगरसेवक व माजी नगरसेविकांचे प्रभाग लक्ष्य करण्यात येत आहेत.त्यामध्ये ( प्रफुल्ल साने,प्रशांत राऊत,कांता पाटील,रुपेश जाधव,अरुण जाधव,अनिल भोगले,जया पेंढारी,सखाराम महाडिक,रंजना थालेकर,मार्शल लोपीस,प्रज्ञा देसाई,भरत मकवाना,रमेश घोरकाना,सुनील आचोळकर,सीताराम गुप्ता,वृंदेश पाटील,प्रवीण शेट्टी व ( सर्वजण बविआ ) सेनेच्या ( उबाठा ) किरण चेंदवणकर,) यांचा समावेश आहे.अन्य ठिकाणी विजय मिळवण्यात भाजपला फारसे श्रम पडणार नाहीत,अशा निष्कर्षाप्रत भाजपचे हे नेते आले आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान हॉटेल विवांता हॉटेलमध्ये झालेले मारहाण प्रकरण व अडकून पडलेल्या तसेच भयभीत झालेल्या महिला,या दोन इश्यूचे भांडवल भाजप या निवडणुकीतही करण्याच्या तयारीत आहे.
दुसरीकडे शिंदे गटाचे नेते सुदेश चौधरी,एकेकाळी माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे जिवलग मित्र असलेले माजी नगरसेवक महेश पाटील बविआचे विरार व वालीव भागातील काही माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत.या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे जवळपास ७० % नगर सेवक डेंजर झोनमध्ये आहेत.त्यामुळे त्यांना बविआचे नेते तिकीट देतील,असे वाटत नाही.त्यामध्ये ( विरार पूर्व, मांडवी,मनवेलपाडा व संतनगर आसपासच्या परिसरातील चार ते पाच नगरसेविकांचा समावेश आहे.)

