दिपक मोहिते,
” हल्लाबोल,
येथे तर कुंपणच शेत खातयं….
मुंबई उच्च न्यायालयाने डोंबिवलीत उभारण्यात आलेल्या ६५ अनधिकृत इमारती संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये ३५० भूमाफिया,आयुक्त,९ प्रभाग समितीचे प्रभाग सहा.आयुक्त हे जबाबदार असल्याची नोंद केली आहे. या नोंदीची दखल घेऊन शासनाच्या एका अति उच्चपदस्थ अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींच्या बैठकीत या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आग्रही राहण्याचे मत व्यक्त केले आहे.त्यामुळे भूमाफियासह सुमारे तीनशे ते चारशे जण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामसंदर्भात खाजगी जमीन मालक,बांधकामधारक,
वास्तुविशारद व इमारतींची बनावट कागदपत्रे तयार करणारे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी हे सारे जबाबदार आहेत,असे निरीक्षण नोंदवले आहे.अशा सर्व प्रकरणात भूमाफिया व अनधिकृत बांधकाम व्यावसायिक कुठेही कागदोपत्री नसतात, ही सर्व बांधकामे त्यांचे वाहनचालक मुकादम,मजूर,घरात काम करणारे घरगडी,यांच्या नावावर करण्यात येत असतात.अशा अनधिकृत बांधकामाची प्रकरणे उघडकीस आली की बांधकाम व्यवसायिक या लोकांना
स्वखर्चाने त्यांच्या मूळगावी किंवा अन्य ठिकाणी पाठवून देत असतात.या गैरकृत्यात मनपा अधिकारी व पोलीस देखील सामील असतात.
वसई- विरार परिसरात गेल्या २५ वर्षात अशाप्रकारे सुमारे ५० हजार अनधिकृत बांधकामे उभी राहिली.या गोरख धंद्यात भूमाफियाना लोकप्रतिनिधीसह नगररचना,अनधिकृत बांधकाम विरोधी विभाग, महावितरण,सार्वजनिक बांधकाम व अन्य घटकांचे सर्वोतोपरी सहकार्य मिळत असते.अनेक लोकप्रतिनिधी व भूमाफिया आपले मित्र,कर्मचारी यांच्या बेनामी कंपन्यांच्या नावावर आर्थिक व्यवहार करत असतात.बेनामी कंपन्यांचे मालक व पडद्यामागचे सूत्रधार ( मूळ मालक ) यांच्या बँक व्यवहाराची चौकशी केल्यास वसई – विरार परिसरात हजारो कोटीचा आर्थिक घोटाळा उघडकीस येऊ शकतो.अनेक लोकप्रतिनिधीनी वसई विरार महानगरपालिकेत विविध विकासकाच्या निविदा अशाच ” मोडस ऑपरेंडी,” चा अवलंब करत मिळवली आहेत.त्यामुळे गेल्या दोन दशकात करदात्यांच्या पैश्याची अक्षरशः लूट झाली.या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनीही आपले हात चांगलेच धुवून घेतले.या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी गैरकृत्यात सहभागी असलेल्या समाज कंटकांचे नाक दाबून रग्गड वसुली केली.या महानगरपालिकेत व्हाईट कॉलर समाजकंटकांनी बाजार करवसुलीचे ठेकेदेखील अशाचप्रकारे लुटले.
सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची लूट करून या समाजकंटकांनी आपल्या सात पिढ्या बसून खातील,इतका मलिदा गोळा केला आहे.बोगस सीसी,ओसीवर समाजकंटकानी केवळ लोडबेरिंग इमारती,चाळी व अनधिकृत इमारती बांधून वसई – विरार परिसराची ओळख ” गुन्हेगारीचे माहेरघर,” करून टाकली आहे.त्यास समाजातील सर्व घटक जबाबदार आहेत.दुर्देवाने या समाज कंटकाना पाठीशी घालणारे मनपा अधिकारी,पोलीस व लोकप्रतिनिधी हे जबाबदार आहेत.नालासोपारा येथे ४१ व डोंबिवली येथील ६५ इमारती हे हिमनगाचे एक टोक आहे.खोलात जाऊन शोध घेतल्यास तपास यंत्रणेच्या हाती मोठे घबाडच लागू शकते.पण शोध कोणी घ्यायचा ? हा खरा प्रश्न आहे,कारण,येथे तर शेतच कुंपण खातयं…..

