दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ; अनेक राजकीय पक्षांना स्वकीयांकडून दगाफटका,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.प्रभाग रचनेच्या प्रश्नावरून निवडणूक प्रक्रिया पुन्हा न्यायालयात गेली तर या निवडणुका पुन्हा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या जातील.या निवडणुका पुढे जाव्यात,यासाठी महायुतीचे सरकारकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे.जर या निवडणुका लांबणीवर गेल्या तर ते महायुतीमधील घटक पक्षांसाठी फायद्याचे ठरणार आहे.हिंदी सक्तीच्या विषयावर मराठी भाषिक महायुती सरकारवर प्रचंड नाराज आहेत.अशावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांना मिळणारा प्रतिसाद हा महायुतीला डोकेदुखी ठरणारा आहे.त्यामुळे या निवडणुका होतील कि नाही,या विषयी सर्वत्र साशंकता निर्माण झाली आहे.अशी स्थिती असतानाही अनेक राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.ठाणे महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला धोबीपछाड देण्यासाठी भावी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,पालघरचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक,आ.निरंजन डावखरे व आ.संजय केळकर यांनी एकत्रितपणे मोर्चेबांधणी सुरू केली आहे.तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,त्यांचे चिरंजीव खा.डॉ.श्रीकांत शिंदे,खा.नरेश म्हस्के व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.गणेश नाईक व एकनाथ शिंदे हे दोघेही जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे हाडवैरी म्हणून ओळ्खले जातात.एकेकाळी हे दोघेही मूळ शिवसेनेत होते.पण डॉ.संजीव नाईक यांना ठाण्याहुन खासदारकीचे तिकीट देण्यावरून या दोघामध्ये वितुष्ट निर्माण झाले.त्यानंतर फडणवीस यांनी शिंदे यांना खिंडीत पकडण्यासाठी नाईक यांना कॅबिनेटमंत्री पद बहाल केले.कॅबिनेटमंत्रीपद मिळाल्यानंतर गणेश नाईक यांचा घोडा कानात वारे शिरल्यागत चौफेर उधळू लागला.शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला होता.त्यामुळे संतापलेल्या शिंदे यांनी आपले विश्वासू सहकारी असलेले प्रताप सरनाईक याना गणेश नाईक यांच्या गडात जनता दरबार घेण्यासाठी पाचारण केले.अशाप्रकारचे कुरघोडीचे राजकारण टिपेला पोहोचले असताना नवी मुंबई व ठाणे या जिल्ह्यातील दोन महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.या संघर्षात या दोन्ही महानगरपालिकेतील मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहतात,हे पाहायला लागेल.
दुसरीकडे वसई- विरार शहर महानगरपालिका व मीरा – भाईंदर महानगरपालिका या दोन महत्वाच्या महानगरपालिका जिंकण्यासाठी महायुती व शिवसेना उबाठा गट तसेच वसई-विरार येथे भाजप व बहुजन विकास आघाडी समोरासमोर उभे ठाकणार आहेत.मीरा- भाईंदर येथे भाजपचे आ.नरेंद्र मेहता,गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे,प्रताप सरनाईक असा सामना रंगणार आहे.येथे होणाऱ्या लढतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मनसे देखील काही जागा लढतील,अशी शक्यता आहे.वसई विरारमध्ये काही किरकोळ जागांचा अपवाद वगळता ८० ते ९० % जागा भाजप लढण्याच्या तयारीला लागला आहे.बविआचे अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक गणेश नाईक,विवेक पंडित यांच्या संपर्कात आहेत.कोणत्याही परिस्थितीत वसई – विरार मधून बहुजन विकास आघाडीला मुळासकट उखडून टाकण्यासाठी गणेश नाईक,विवेक पंडित,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस व भावी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विडा उचलला आहे.याकामी त्यांना बविआच्या एका नेत्यांकडून सर्वप्रकारची मदत मिळणार आहे.गेली अनेक वर्षे पक्षाच्या पहिल्या फळीतला नेता असतानाही त्याच्या पदरात काहीच पडले नाही.त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याने बविआच्या वरिष्ठ नेत्याला चांगलाच धडा शिकवला.या विधानसभा निवडणुकीपूर्वी भावनात्मक दृष्टिकोनातून पॅचवर्क करण्यात आले,पण तोवर पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले होते व बविआचे तीनही उमेदवार भुईसपाट झाले.या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी मुंबईत नुकतीच भाजपचे वसई तालुक्यातील एक पदाधिकारी,मुख्यमंत्री व या नेत्याची बैठक पार पडली.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.या नेत्यांसोबत त्यांचे अनेक समर्थक,माजी नगरसेवक/ नगरसेविका भाजपवासी होतील,असा अंदाज आहे.या पक्षात आणखी काही नेते व पदाधिकारी भाजपमध्ये जाण्यासाठी दबा धरून बसले आहेत.बघूया निवडणुकीच्या तोंडावर किती बॉम्ब फुटतात ते…बविआला खरा दगाफटका स्वकीयाकडून होण्याची शक्यता आहे.

