दीपक मोहिते,
सरकार पडले उताणे,
अखेर ठाकरे बंधूनी बाजी मारली,
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या रेट्यामुळे सरकारला ” हिंदीची सक्ती,” या ज्वलंत प्रश्नावर सपशेल माघार घ्यावी लागली.काल पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शोकाकुल वातावरणात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे वीस मिनिटे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.एकीकडे फडणवीस यांची पोपटपंची सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुतकी चेहरे करून बाजूला बसले होते.माघार घेत असल्याचे सांगताना फडणवीस यांचे वागणं हे ” गिर गया,तो फिर भी टांग उपर,” अशा स्वरूपाचे होते.
सेना व मनसेचा ५ जुलै रोजी निघणारा मोर्चा,हा रेकॉर्डब्रेक असा असेल,या भितीने सरकारची गाळण उडाली होती.या तिन्ही पक्षातील आमदार व खासदारांचा या तिन्ही नेत्यांवर प्रचंड दबाव होता.या तिढ्याची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी,यासाठी ते आग्रही होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीत आपल्याला फटका बसेल,असे अनेकांनी फडणवीस, शिंदे व पवार या त्रिकुटाच्या निदर्शनास आणल्यानंतर फडणवीसांना ही उपरती सुचली.पण तत्पूर्वी पत्रकार परिषदेत या निर्णयाला सर्वस्वी उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचे दाखवण्यासाठी फडणवीस केविलवाणी धडपड करताना उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले.असो,उद्धव व राज या दोघांचे सरकारविरोधात मैदानात उतरणे व त्यांच्या एकत्र येण्याच्या भूमिकेमुळे मराठी भाषिक देखील त्यांच्या पाठीशी एकवटले होते.त्यांचा मोर्चा हा ” भूतो,न भविष्यती,”असा निघेल,असा अंदाज मुंबई पोलिसांनी व्यक्त केल्यानंतर शासनस्तरावर हालचालींना वेग आला.या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांवर टीका करताना अक्षरशः पोरखेळ करत होते.त्यांनी या पत्रकार परिषदेत विरोधकांकडून आलेल्या निवेदनात व्याकरणाच्या २४ चुका असल्याचा हास्यास्पद दावा केला.तसेच ” हिंदी सक्ती,” संदर्भात दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करताना त्यांनी आपल्या मराठी मुलांचे कसे नुकसान होणार आहे,आपल्या मराठी मुलांना रोजगारापासून कसे वंचित राहावे लागणार आहे,हे अत्यंत पोटतिडकीने सांगत होते.ज्यांची मुले बॉम्बे स्कॉटिश,केंब्रिज व परदेशातील शाळांमध्ये शिक्षण घेत असतात,त्या राजकारण्यांना आता मराठी मुलांच्या भवितव्याची चिंता सतावते,हेही नसे थोडके…
या सर्व घडामोडीमुळे फडणवीस सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली,फडणवीस यांनी कितीही शब्दच्छल करत मराठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी या खेळात ठाकरे बंधुनीच बाजी मारली,हे कोणालाच नाकारता येणार नाही.

