दिपक मोहिते,
” रणसंग्राम,”
तरच बहुजन विकास आघाडी,भाजपचा अश्वमेघ घोडा रोखू शकेल….
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून प्रभाग रचना व मतदारांच्या यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.दिवाळीनंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे.प्रभाग रचना करताना सर्वच राजकीय पक्षानी दक्ष राहण्याची गरज आहे.सत्तेत असलेला पक्ष,आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला पाडण्यासाठी आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना करण्याची कट कारस्थाने करत असतो.यापूर्वी अनेक महानगरपालिका निवडणुकीत अशाप्रकारची कटकारस्थाने अनुभवायला मिळाली आहेत.अशा गैरकृत्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी व निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील सामील असतात.यामध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होत असते.त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला या प्रक्रियेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.
एकीकडे निवडणूक यंत्रणा सक्रिय होत असताना दुसरीकडे राजकीय पक्षही कामाला लागले आहेत.वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजप/ शिवसेना ( शिंदे गट ) व बहुजन विकास आघाडी हे तीन पक्ष सर्वच्या सर्व जागा लढवतील.पण बहुजन विकास आघाडीचे नेते माजी आ.हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर,या दोघाना तिकीटवाटप करताना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.जुन्या नगरसेवक व नगरसेविकापैकी ७० ते ८० % लोकांना पुन्हा तिकीट देणे, या निवडणुकीत पक्षाच्या अंगलट येऊ शकते.जे नगरसेवक बदनाम झाले आहेत,ज्यांची प्रतिमा जनमानसात डागळली गेली आहे.तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जे नगरसेवक व नगरसेविका,पक्षाच्या प्रचारात निष्क्रीय होते.( प्रचारात न दिसणे,मतदानाच्या दिवशी बुथवरून गायब होणे,) अशांना हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा थारा देता कामा नये.पुन्हा त्याच चेहऱ्यांना उमेदवारी दिल्यास याही निवडणुकीत पक्षाचा घात होऊ शकतो.पक्षात आम्ही तुमच्यासोबत आहोत,असे सांगणारे,पण प्रत्यक्षात पक्षाला पोखरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ठाकुरानी ओळखले पाहिजे,त्यासाठी त्यांनी स्वतःच्या विश्वासातील सहकाऱ्यांची फळी उभारली पाहिजे.या फळीतील त्यांच्या सहकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून वॉचडॉगची भूमिका निभावणे गरजेचे आहे.कारण गेल्या पाच ते सहा वर्षात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे.या सर्व परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री गणेश नाईक चांगलेच सक्रिय झाले आहेत.तसेच हे दोघे बहुजन विकास आघाडीच्या नाराज व पक्षापासून दुरावलेल्या पदाधिकाऱ्यांशी संधान बांधून आहेत.विरार भागातील बविआच्या अनेक जागा पाडण्यासाठी बविआचे नाराज, भाजप,रा.स्व.सं.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यापूर्वीच रिंगणात उतरले आहेत.या निवडणुकीत शिवसेनेचे ( शिंदे गट ) स्थानिक नेते ” आम्हाला जागावाटपात न्याय न मिळाल्यास आम्ही स्वबळावर लढवु,” अशा वल्गना करत असले तरी त्यांना मिळतील,त्या जागांवर त्यांना समाधान मानावे लागणार आहे.प्रत्येक
निवडणुकीच्या काळात बविआचे काही नेते ” आम्ही इतक्या जागा जिंकणार व आम्ही पैकीच्या पैकी जागा जिंकणार,” म्हणून सोशल मीडियावर वल्गना करत असतात.हे पक्षासाठी अत्यंत धोकादायक असून अशा वल्गनामूळे कार्यकर्ते प्रचारात निष्क्रीय राहतात,त्याचा फटका पक्षाला बसत असतो.अशा वल्गना करणे,ठाकुरानी बंद करावे.उलट आपल्या कार्यकर्त्याना प्रभावीपणे प्रचार करा,आपली ही लढाई,जीवन मरणाची लढाई असून ती आपल्याला प्राणपणाने लढायची आहे,असे त्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे.तरच बहुजन विकास आघाडी हा भाजपचा अश्वमेघ घोडा काही अंशी रोखू शकेल.

