दीपक मोहिते,
” रणसंग्राम,”
शिवसेना ( उबाठा ) / मनसे युती ; अखेर घोडं गंगेत न्हालं, भाजपच्या गोटात अस्वस्थता…
गेल्या तीन महिन्यापासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांच्या एकत्र येण्यावरून जोरदार चर्चा सुरू होती.अखेर काल या दोघांनी एकमेकांना टाळी दिली.हे दोघे भाऊ एकत्र येऊ नयेत,यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे हे दोघे पाण्यात देव टाकून बसले होते.पण या दोघांना पाण्यातील देव काही बाहेर काढता आले नाहीत.या दोघांच्या एकत्र येण्याच्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो.या दोघांच्या पक्षाचा हिंदी सक्तीच्या विरोधात आता संयुक्त मोर्चा निघणार आहे.त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
राज्यातील प्रत्येक महानगरपालिका,या राजकीय पक्षांसाठी सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत.गेल्या सहा ते सात दशकात या महानगरपालिकांच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्ष आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ झाले.त्यामुळे या महानगरपालिका जिंकण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष जिवाच्या आकांताने या रणसंग्रामामध्ये उतरत असतो.मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते.या महानगरपालिकेवर गेली चार दशके उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कायम वर्चस्व राहिले आहे.काही काळ सेना – भाजप युतीनेही कारभार केला.पण २०१९ साली युती तुटल्यानंतर भाजपने ही महानगरपालिका सेनेकडून खेचून घेण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली.शिवसेनेच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी ही महानगरपालिका आपल्या ताब्यात असावी,यासाठी भाजपची धडपड सुरू आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला फटका बसला असताना मुंबई शहरात मात्र त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले तसेच विधानसभा निवडणुकीतही या शहरातील मतदारांनी भाजपला साथ दिल्यामुळे भाजपने ही महानगरपालिका जिंकण्यासाठी आता कंबर कसली आहे.पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठी मतदार हा कायम शिवसेनेला साथ देत आला आहे व पुढेही तशीच साथ मिळेल,अंदाज बाळगून भाजपने राज ठाकरे यांना चुचकारण्यास सुरुवात केली होती.भाजपचे फडणवीस,शेलार,महाजन,शिंदे गटाचे एकनाथ शिंदे,उदय सामंत,या सगळ्यांचा राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या गॅलरीत वावर वाढलेला पाहायला मिळत होता.राज ठाकरे यांची मनसे महायुतीमध्ये सामील होणार,अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली.तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केल्यामुळे या चर्चेवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले होते.पण राजकारणात कधीही काही होऊ शकते,या उक्तीनुसार राज ठाकरे यांनी एका मुलाखातीमध्ये ” मी व उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतो,” असे वक्तव्य केले व शिंदे / फडणवीस या दोघांसह त्यांच्या संकटमोचक सहकाऱ्यांच्या पोटात गोळा आला आणि त्यांची पावले राज यांच्या निवासस्थानाकडे पुन्हा वळू लागली.दरम्यान उद्धव ठाकरे यांनीही राज यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र येण्याचे संकेत मिळू लागले.गेल्या महिन्यात राज्यसरकार केंद्राच्या छुप्या अजेंडानुसार हिंदीची सक्ती करू पाहत आहे,हे लक्षात आल्यानंतर राज्याभरात त्याचे जोरदार पडसाद उमटले. आपल्या हाती आलेले ” आयते कोलीत,” लक्षात घेऊन हे दोघे ठाकरे बंधू वेगाने कामाला लागले.या दोघांनी भाजपच्या या छुप्या अजेंडाला विरोध करण्यास सुरुवात केली.दोघांनीही राज्यशासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोर्चे काढण्याचे निर्णय जाहीर केले.दोन वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा दोघांनी एकत्र येऊन एकच संयुक्त मोर्चा काढुया,असा प्रस्ताव राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला व तो उद्धव ठाकरे यांनी मान्य केला.आता हा संयुक्त मोर्चा ५ जुलै रोजी निघणार आहे.हा मोर्चा भविष्यात राज्यातील राजकारणाची दिशा बदलणारा ठरणार आहे.गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने ज्या पद्धतीने महाराष्ट्राची गळचेपी केली व त्यास महायुतीच्या राज्यसरकारने जी साथ दिली.त्यामुळे मराठी मतदार,हे भाजप व शिंदे गटाला दणका देतील,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

