वसंत भोईर,वाडा
खेकड्यांसाठी ( मुठे ) खवय्यांची सर्वत्र भटकंती सुरू,
पावसाच्या दमदार आगमना नंतरही खेकड्यांचे ( मुठे ) बाजारात अद्याप आगमन झालेले नाही.खेकड्यांची चव घेण्यासाठी आतुर असलेल्या खवय्यांवर खेकड्यांच्या शोधात बाजारपेठांत, गांव-पाड्यात तसेच रात्रीच्या वेळी पळींदा व बॅटरी घेऊन रानमाळावर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
पावसाच्या आगमनानंतर जमिनीत ओलावा निर्माण झाला की खोलवर बिळांमध्ये असलेले मुठे बाहेर पडतात. अत्यंत चपळ असलेल्या या मुठ्यांना पकडून ते शिजवून जेवणातील एक चांगला गुणकारी व चवदार खाद्य पदार्थ भाजी म्हणून बनवून खाण्यात येतो.जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात पाऊस अधूनमधून सुरु झाला आहे. जंगल भागात व माळरानावर गवताचे प्रमाण अधिक झाले आहे.खेकड्यांचे खाद्य असलेले गवत अगदी खेकड्यांना बिळाजवळच उपलब्ध झाल्याने हे चपळ असलेले खेकडे (मुठे) पकडणे कठीण झाले आहे.यामुळे बाजारात मुठ्यांची विक्री करणाऱ्या बांधवांची संख्या आता कमी दिसत आहे. यामुळे खेकड्यांची चव चाखण्यासाठी आतुर असलेल्या खवय्यांना खेकड्यांसाठी गाव-पाड्यावर भटकंती करावी लागत आहे.
खेकड्यांचे आहारातून ( मुठे ) सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होते. तसेच शरीरात प्रतिकारशक्ती वाढवते.
निरोगी आरोग्यासाठी खेकडा हे उत्तम सीफूड आहे.सर्दी किंवा पडसे झाले तर शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी खेकड्याचे सेवन केले जाते.खेकड्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स हे त्वचेची चमक आणि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.तसेच खेकड्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने
हाडांच्या मजबूतीसाठी खेकड्याचे सेवन खूप गुणकारी समजले जाते.

