दीपक मोहिते,
आयुक्त सुस्त ; करदाते नागरिक बेहाल,
वसई व नालासोपाऱ्यामध्ये कोणताही पक्ष निवडून आला तरी नागरिकांचे हाल मात्र संपायचे नांव घेत नाही.गेली अनेक वर्षे ही दोन्ही शहरे दरवर्षी जलमय होत असतात. नियोजनशून्य बांधकामे,नाल्यात होणारी अनधिकृत बांधकामे, पावसाळी पाणी वाहून नेणारे नाले अरुंद होणे व नालेसफाईच्या नावाखाली मनपा अधिकारी, लोकप्रतिनिधी व ठेकेदारांकडून होणारी लूट आदी कारणामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना दरवर्षी अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते.
यंदाही लोकप्रतिनिधीनी नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना शेकडो सेल्फी काढले व ते सोशल मिडियावर पोस्ट केले.पण गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने या लोकप्रतिधीनी व आयुक्ताचे चांगलेच वस्त्रहरण केले.नालासोपारा शहरातील अनेक नागरिकांची घरे व व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून त्यांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन्ही आमदार व बहुचर्चीत आयुक्त परिसरात फिरकले देखील नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यासाठी सारी यंत्रणा दोन दिवस राबत होती.आयुक्तानी तर उदघाट्नस्थळी दोन दिवस मुक्कामच ठोकला होता. मुख्यमंत्र्याच्या सरबराईमध्ये उणीवा राहू नये,यासाठी आयुक्तानी शहरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे सत्तेत कोणी येवोत, पण नागरिकांचे हाल काही संपत नाहीत,हेच खरं म्हणावे लागेल.

