दीपक मोहिते,
” निवडणूक पर्व, ”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यात निवडणुकीचे बिगुल वाजवले,
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल वसईच्या दौऱ्यावर आले होते.त्यांनी महानगरपालिकेच्या इस्पितळाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण करून एकप्रकारे निवडणुकीचे बिगुलच वाजवले आहे.वसईकर नागरिकांसाठी आधुनिक दर्जाचे इस्पितळ हा अत्यंत जिव्हाळ्याचा तसेच संवेदनशील असा विषय आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ९० बेडच्या विस्तारीत कक्षाचे लोकार्पण करून वसईकर नागरिकांची मने जिंकली आहेत.या घटनेचा आगामी निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.तसेच पाणी व अनेक प्रलंबित असलेली अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी विविध वित्तीय संस्थाकडून निधी उभारण्यावर भर दिला आहे. मेट्रोच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्नाला लागले आहे.
तसेच काल त्यांनी या दौऱ्यात शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी मनोर – दुर्वेस या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्याशी संवाद साधला.या त्यांच्या प्रयोगाला प्रचंड यश मिळाले.काही दिवसापूर्वी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी मनोर येथे उभारण्यात येणाऱ्या ट्रॉमा हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी पालघरचा दौरा आयोजित केला होता.त्यामुळे या हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे.
या सर्व घडामोडी लक्षात घेता भाजप ग्रामीण भागात आपले हातपाय पसरण्याच्या प्रयत्नात असल्याचे संकेत मिळत आहेत.पालघर व ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या लोकसंख्या वाढीला प्रचंड वेग आला आहे.मुंबईला लागून असलेले या दोन्ही जिल्ह्यावर आपले वर्चस्व असावे,यासाठी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री गणेश नाईक व दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांचे प्रयत्न होत आहेत.त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पालघर जिल्ह्यात मंत्र्यांची मांदीयाळी झालेली बघायला मिळेल,तसेच विविध आश्वासनाची खैरात देखील होणार आहे.

