दीपक मोहिते,
माणुसकीला काळिमा,
वा रे चौथी मुंबई ; रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे बाळाचा मृतदेह पिशवीतून नेला,
पालघर जिल्ह्याची वाटचाल चौथ्या मुंबईच्या दिशेने सुरू झाल्याचे आपले नेतेमंडळी सतत सांगत असतात. वाढवण बंदर, विमानतळ,बुलेट ट्रेन व मुंबई-वडोदरा जलदगती मार्ग व अन्य विकासकामे प्रस्तावित आहेत.या विकासकामावर लाखो कोटी रु.खर्च करण्यात येत आहेत.मात्र पालघर जिल्हावासीय आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. पाणी,वैद्यकीय सेवा,शिक्षण व आरोग्य,या मूलभूत गरजापासून ते वंचित आहे. आरोग्य सेवेची पार दुर्दशा झाली आहे.कुपोषणांमुळे दरवर्षी किती बालके मृत्यूमुखी पडतात,याविषयीची आकडेवारी दस्तूरखुद्द जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे नाही.तसेच गरोदरमातांची स्थिती देखील तशीच असल्याचे पाहायला मिळते.
मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे जोगलवाडीत वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याला नाशिक येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळ काढले,पण ते मृतावस्थेत होते.त्यानंतर डॉक्टरांनी बाळ त्यांच्या आईवडिलांच्या सुपूर्त केले.ते बाळ घरी घेऊन जाण्यासाठी त्यांना रुग्णवाहीका उपलब्ध करून दिली नाही.त्याच्या मृत्यूनंतरही त्या बालकाच्या यातना काही थांबल्या नाहीत,मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहीका न मिळाल्यामुळे अखेर त्याच्या आईवडिलांनी बाळाचा मृतदेह,परकरमध्ये गुंडाळला व घरगुती वापराच्या पिशवीतून ८० कि.मी.अंतरावर असलेल्या आपल्या गावी नेला व तेथे गावातील जमिनीत त्याचा मृतदेह पुरला.
११ जून रोजी पहाटे तीन वाजता बाळाची आई अविता हीच्या पोटात दुखायला सुरु झाल्यानंतर स्थानिक आशा सेविकेच्या प्रयत्नातून दुपारी बारा वाजता एका खाजगी गाडीतून तीला रुग्णालयात नेण्यात आले.रुग्णवाहिकेला फोन करूनही रुग्णवाहीका जोगलवाडीत आली नाही.
मिळालेल्या खाजगी गाडीने त्यांना खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर खोडाळ्यात अविता वेदनेने तडफडत होती.तेथे तब्बल दोन तास आम्ही ताटकळत उभे होतो.पण उपचार होत नव्हते.
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी अश्विनी मोरे यांनी सांगितलं की, ” ते येथे आले तेव्हा रुग्णाच्या पोटातील बाळाचे ठोके होत नव्हते,म्हणून आम्ही मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवायचं ठरवलं. पण आमच्या येथे रुग्णवाहिका नव्हती म्हणून आसेवरून ती आम्ही मागवली.त्यामुळे दोन तास उशीर झाला.”
अखेर अविता आणि सखाराम मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पोहोचले.तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर पोटातलं बाळ दगावल्याचं रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अविताचे पती सखाराम यांना सांगितले.पण अविताच्या अंगात ताप होता आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठीच्या सुविधा मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी रुग्णाला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला.
नाशिकमध्ये पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते. तेथे डॉक्टरांनी अविता यांच्यावर उपचार करून पोटातील मृत अर्भक सखाराम आणि अविता यांच्या हवाली केले.या सर्व घडामोडीनंतर आम्हाला कुणीच विचारलं नाही,तसेच बाळाचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहीकाही देण्यात आली नाही म्हणून मी मेलेलं बाळ पिशवीत घेऊन आलो. ”
नाशिक जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर सखाराम कवर यांच्याकडे त्यांचं मृत बाळ सुपूर्द केलं गेलं.आता नाशिकवरून मोखाडा आणि मोखाड्यावरून त्यांच्या गावी म्हणजेच जोगलवाडीला जायला गाडी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते.या सर्व घडामोडीमुळे उद्दिग्न झालेले
सखाराम म्हणाले, ” बाळाला घेतलं,त्याला बायकोच्या परकरात गुंडाळलं,एका पिशवीत घातलं आणि बायकोला घेऊन बसमध्ये बसलो.त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला कुणीच विचारलं नाही की आता हे मृत बाळ आणि बायको घेऊन तुम्ही कसे जाणार आहात ? खाजगी गाडी करायला पैसे नव्हते, म्हणून बसने यावं लागलं.८० कि.मी.चा रस्ता त्यादिवशी संपतच नव्हता,पिशवीत माझं मेलेलं बाळ आणि मी तसाच घरी आलो.”
जोगलवाडीत आल्यानंतर सखाराम यांनी त्यांचं मृत बाळ जमिनीत पुरलं आहे.
११ आणि १२ जून रोजी घडलेला हा प्रकार माध्यमांना कळायला आणखी तीन दिवस लागले आणि जोगलवाडीत अँब्युलन्स पोहोचायला जसा उशीर झाला अगदी तसाच उशीर ही अत्यंत गंभीर बातमी माध्यमांपर्यंत पोहोचायला झाला.
त्यानंतर विक्रमगड विधानसभेचे माजी आ.सुनील भुसारा हे सखाराम यांच्या घरी पोहोचले.त्यांची विचारपूरस केली व अविता यांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार केले.
आता पोट भरण्यासाठी मला एकट्यालाच कामावर परतायचं आहे,कारण बायकोला अजूनही उठता येत नाही.”
आपत्कालीन परिस्थितीत राज्यातल्या रुग्णांवर उपचार व्हावेत,यासाठी सुमारे नऊशेहून अधिक रुग्णवाहीका तैनात करण्यात आल्या आहेत.त्या सगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी असल्याचा दावा केला जातो.
पालघर जिल्ह्याची आकडेवारी पहिली तर या जिल्ह्यात एकूण २९ रुग्णवाहीका आहेत.पण ११ जूनच्या पहाटे सखाराम आणि अविता यांच्या घरी एकही रुग्णवाहीका पोहोचली नाही.
या सर्व घडामोडीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री आता दोषीवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगत सुटले आहेत.कारवाई लाख कराल हो,पण ते बाळ त्यांच्या आईवडिलांना परत मिळणार आहे का ? पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही कायम मरणासन्न स्थितीत व्हेन्टीलेटर असलेली पाहायला मिळते.सर्वप्रथम तीला जिवंत करा,तरच ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला न्याय मिळू शकेल.

