दीपक मोहिते,
आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधावे,
राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आज विविध विकासकामाचे उदघाटन करण्यासाठी पालघरच्या दौऱ्यावर येत आहेत.गेल्या महिन्याभरात राज्याचे डझनभर मंत्री पालघरच्या दौऱ्यावर येऊन गेले.यामध्ये सर्वाधिक भरणा भाजपच्या मंत्र्यांचा होता.दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे केवळ प्रताप सरनाईक यांनी हजेरी लावली होती.पालकमंत्री गणेश नाईक एक दिवस आड हजेरी लावत आहेत.आज फडणवीस समवेत भाजपचे अनेक मंत्री पालघर व वसईत येत आहेत.
वसईत महानगरपालिकेच्या डी.एम.पेटिट रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या ९० बेडच्या बालरुग्णालयाचे लोकार्पण व वसईच्या आ.स्नेहा दुबे यांच्या कार्यालयाचे उदघाटन,असे दोन कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.विधानसभेच्या तीन जागा जिंकल्यानंतर फडणवीस प्रथमच वसईत येत आहेत.त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे.त्यांच्या या भेटीदरम्यान आ.स्नेहा दुबे,आ.विलास तरे व आ.राजन नाईक या तिघांनी या उपप्रदेशातील अनेक प्रलंबित प्रश्न व विकासाचे जातील समस्या याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची गरज आहे.त्यासाठी वसईकर जनतेतर्फे प्रलंबित विकासकामे व प्रश्न याची सनद सादर करत आहोत.
१) आजही वसईच्या अनेक शहरी भागातील लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही.जलवाहिनी अंथरण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे,ते वेगाने व्हावे.त्यामुळे लोकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
२) नारिंगी येथे रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे,
३) तोडण्यात आलेल्या ४१ इमारतीमधील ४०० कुटुंबाचे जलदगतीने पुनर्वसन व्हावे,यामधील दोषींवर कारवाई व्हावी.
४ ) रेल्वेस्थानक परिसरात होणारी वाहतूककोंडी,अनधिकृत रिक्षांचा धुमाकूळ,वाहतूक पोलीस खात्याचा मनमानीपणा व भ्रष्टाचार,
५) वसई विरार शहर मनपातील प्रत्येक विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार,अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याऐवजी मनपाच्या अधिकाऱ्याकडून मोठ्याप्रमाणात वसुली करण्यात येते,त्यावर पायबंद घालण्यात यावा,मनपा हद्दीत दरवर्षी रस्ते बांधणी व दुरुस्ती कामावर हजारो कोटी रु.खर्च होत असतात.पण अंतर्गत रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे.
६ ) वसई तालुक्यात बिल्डर,भूमाफिया,
चाळमाफिया यांनी गेल्या पंचवीस वर्षात सरकारी,वनजमिनी व आरक्षित जमिनी लुटल्या,त्याची सर्वंकष चौकशी व्हावी,
७) महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नळजोडण्या देताना अव्वाच्या सव्वा रकमा उकळण्यात येतात,त्याचीही चौकशी व्हावी.
८) अनेक बिल्डरांनी टोलेजंग इमारती उभारल्या,पण त्या भागातील रस्ते व गटाराची उभारणी स्वखर्चाने न करता मनपाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून महानगरपालिकेच्या निधीतून खर्च केला.याचीही चौकशी व्हावी.
९ ) पेल्हार,कामण व वालीव भागात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या
माजी नगरसेवकांवर एम.आर.टी.पी.
कायद्याखाली कारवाई करावी.
१०) वाढत्या लोकसंख्येच्या या उपप्रदेशात केईएम,नायर व जे.जे.इस्पितळाच्या धर्तीवर अत्याधुनिक इस्पितळ उभारण्यात यावे.
११) तुंगारेश्वर,पारोळ,तिल्हेर व चिंचोटी परिसरात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असते,या गैरप्रकारावर आळा घालण्यात यावा.
१२) पालघर जिल्ह्यात विशेष करून वसई शहर व गाव व नालासोपारा शहरात कोकेन व अन्य मादक द्रव्यांची मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्री व्यवहार होत असतात,त्यावर कठोर कारवाई करावी,
१३ ) उप्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.पोलीस ठाणी उदंड झाली व मनुष्यबळ देखील वाढले,पण गुन्हेगारी कमी होण्याऐवजी तिचा वेलू गगनावर पोहोचला आहे. नव्याने पोलीस आयुक्तालय निर्माण करून काहीही साध्य झालेले नाही.त्यामुळे गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांनी या प्रकरणी कठोर उपाय योजावेत.
१४ ) दरवर्षी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचार सरकारने निपटून काढावा,यातील गैरप्रकाराला आयुक्त,उपायुक्त, आरोग्य अधिकारी व ठेकेदारांची मिलिभगत असुन मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी.मनपा क्षेत्रातील चारही शहरे दर पावसाळ्यात किमान तीन दिवस पाण्यात बुडत असतात.

