दीपक मोहिते,
मोबाईलचा वापर मर्यादेतच व्हायला हवा….
प्रसिद्धी माध्यमाच्या जगात मोबाईल व संगणक,या दोन इलेक्ट्रॉनिक वस्तुंना आता अनन्यसाधारण महत्व आले आहे.ते जगभरातील माध्यमे अत्यंत प्रभावीपणे वापरत आहेत.व्हाटसअप व फेसबुक यानी तर जग आपल्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.या माध्यमामुळे पत्र व तार हा प्रकारच इतिहासात जमा झाला आहे.जगभरात कुठे काय घडले,हे क्षणार्धात आपण घरी बसून पाहू शकतो,इतकी ही माध्यमे प्रभावी ठरली आहेत.त्यामुळे लहान मुले,तरुण-तरुणी,महिला व आबालवृद्ध मंडळी त्याच्या पूर्णपणे आधीन झाले आहेत.एखाद्या वेळी इंटरनेट बंद पडले की आपण अक्षरशः वेडेपीसे होतो.
बदलत्या आपण या सर्व माध्यमाच्या इतक्या आहारी गेलो आहोत कि त्यामधून बाहेर पडणे,आता कोणालाही शक्य नाही.असं म्हणतात कि विकास कधीही एकटा येत नाही,तर विनाशालाही सोबत घेऊन येत असतो.त्याचा अनुभव आता आपल्याला पावलोपावली येऊ लागला आहे.लहान मुले,महिला,वरिष्ठ नागरीक,यांच्या हातातील मोबाईल व त्यावर त्यांचे सतत खेळ,सिरियल्स पाहणे,हे दिवसेंदिवस धोकादायक ठरू लागले आहे.
अनेक साहसी खेळ बघून लहान मुले,त्याचे अनुकरण करू लागले,तर कुटुंबातील व्यक्ती सतत मोबाईलवर व्यस्त राहत असल्यामुळे अनेक कुटुंबामध्ये एकमेकांविषयी गैरसमज होऊन ती उध्वस्त होऊ लागली आहेत.वाहन चालवताना,स्वयंपाकघरात जेवण बनवताना किंवा रात्री झोपताना मुलांच्या हाती मोबाईल असणे,हे संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे.लहान मुले रडू लागली कि आई-वडील त्यांच्या हाती मोबाईल देतात,मोबाईल मिळाला कि मुले शांत होतात,हा विचार आता मोठ्याप्रमाणात रुजू लागला आहे.

सकारात्मक दृष्टिकोन राखून जर या माध्यमाचा वापर झाल्यास ही माध्यमे प्रगतीची कवाडे उघडणारी,अशी आहेत,परंतु त्याचा किती व कसा वापर करायचा ? याबाबत आपण जर मर्यादा ओलांडल्या तर मात्र ही माध्यमे आपल्याला विनाशाकडे नेणारी ठरू शकतात,म्हणून मानवाने ठराविक मर्यादेत राहून त्याचा वापर करणे,गरजेचे आहे.

