दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
खरं तर,केंद्र सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी ” सिंदूर,” पाठवण्याची गरज आहे,
भारत – पाक युद्धात कोण जिंकले आणि कोण हरले, याविषयी जगभरात सध्या वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहेत.आपल्या सैन्याने मुसंडी मारली असताना अवघ्या ७२ तासात दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्यामुळे,तसेच ही शस्त्रसंधी आम्ही घडवून आणली,असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे देशात संशयाचे वादळ घोंगावू लागले.अजूनही ते शमलेले नाही.अधून मधून हे वादळ पुन्हा पुन्हा घोंगावत असते.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक महिलांचे ” सिंदूर,” नाहीसे झाले.त्यामुळे केंद्र सरकारने दोन देशातील या युद्धाला ” ऑपरेशन सिंदूर,” असे गोंडस नांव दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय सुरुवातीच्या काळात भारतीय जनतेच्या भावनेला साद घालणारा ठरला.पण युद्धबंदीनंतर आता भाजपने घरोघरी ” सिंदूर,” वाटप करण्याचे जाहीर केल्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.सोशल मिडियावर पंतप्रधानावर टिकेचा अक्षरशः पाऊस पडण्यास सुरुवात झाली.अनेक महिलांनी भाजपच्या या मोहिमेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.आम्हा महिलांना सिंदूर पाठवणारे हे मोदी कोण ? असा प्रश्न उपस्थित करत काही महिलांनी ” आमचे पती हयात असताना,तिसऱ्या व्यक्तीने आमच्या घरी सिंदूर पाठवणे,ही आपली हिंदू संस्कृती नाही.त्यांना जर सिंदूर पाठवायचे असेल तर मोदी यांनी आपली पत्नी जशोदाबेन यांच्या घरी पाठवावी,आमच्या घरी नको.” अशा प्रतिक्रिया देताना अनेक महिला पाहायला मिळाल्या.
” ऑपरेशन सिंदूर,” हे भारतीय सैन्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे अभियान होते, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. पण राजकीय फायद्यासाठी खालच्या स्तरावर जाऊन त्याचे मार्केटिंग करणे योग्य नव्हते.आपल्या जवानांनी जीवावर उदार होऊन हे अभियान भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी राबवण्यात आले होते.पण युद्धबंदीनंतर या घटनेचे सरकार ज्या पद्धतीने राजकीय फायदा घेऊ पाहते,ते अत्यंत निंदनीय असेच आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाखो कुटुंबांतील महिलांच्या कपाळावरून ” सिंदूर,” हरवले आहे.त्या शेतकऱ्यांच्या घरात सरकारने कधीही ” सिंदूर,” पाठवले नाही.आत्महत्येच्या वाढत्या घटना,दुष्काळ, कर्जबाजारीपणा,मानसिक आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष,इ.कारणामुळे आज ही पिडीत कुटुंबे हलाखीचे जीवन जगत आहेत.खरी गरज आहे,एका नव्या ” ऑपरेशन सिंदूर,” ची, शेतकऱ्यांसाठी,त्यांच्या जीवनासाठी,त्यांच्या आत्मसन्मानासाठी व त्यांच्या पत्नीना समाजात आत्मसन्मानाने उभे राहण्यासाठी…
“ऑपरेशन सिंदूर,” हा शब्द जसा आपल्या जवानांच्या शौर्यगाथेशी संबंधित आहे,तसाच हा शब्द आता एका नव्या लढ्याचे प्रतीक व्हायला हवा.
गेल्या स्वातंत्र्योत्तर काळात सुमारे पाच लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे निरनिराळी कारणे आहेत. कर्जबाजारीपणा,नापिकी आणि हवामान बदल, पाणी, सिंचन, अस्थिर बाजारभाव,शेतमालाला हमीभाव न मिळणे,
कमी पाऊस,अवकाळी अतिवृष्टी,अशा हवामान बदलाशी निगडित जशा आहेत,तशाच त्या मानवनिर्मितही आहेत. पीकविमा योजनांच्या अंमलबजावणीतील बजबजपुरी,बाजारातील अस्थिरता,कर्जाचा बोजा व सावकारांचे दडपण तसेच कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव,नैसर्गिक आपत्ती व त्यानंतर अपुरी सरकारी भरपाई आणि मानसिक आरोग्य सेवांची कमतरता,अशा अस्मानी संकटामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील महिलेच्या कपाळावरचे ” सिंदूर,” पुसले गेले आहे.माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांनी देशासाठी ” जय जवान,जय किसान,” चा नारा दिला होता.त्यामधील उमेद पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने देशामध्ये प्रतिबिंबित होण्याची वेळ आली आहे.कारण आजपर्यंत पाच लाखाहून अधिक महिलांचे ” सिंदूर,” शेतकऱ्यांना कराव्या लागलेल्या आत्महत्यामुळे कायमचे पुसले गेले आहे.त्यामुळे शेतकऱ्यासाठी
” ऑपरेशन सिंदूर,” कसे राबवता येईल ? याचा केंद्र सरकारने विचार करावा,असे आम्हा भारतीयांचे म्हणणे आहे.

