दीपक मोहिते,
महानगरपालिका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अस्तित्व नगण्य असेल…
गेल्या चार दिवसात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाखती आम्ही प्रसिद्ध केल्या.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या ऑक्टो. किंवा नोव्हें.महिन्यात राजकीय पक्षाची कशी तयारी आहे,यावर आपण प्रकाशझोत टाकला.आमच्या वेबपोर्टलने सुरू केलेल्या या उपक्रमाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर त्या पक्षांची महानगरपालिका निवडणुकीत काय स्थिती असेल ? यावर आम्ही सविस्तर विवेचन केले.डोळ्यात अंजन घालणारे हे विवेचन पक्षाचे अनेक नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पसंतीला उतरले.तर काही मूठभर राजकारण्यांच्या मात्र गळी उतरले नाही.त्यांनी थोडीफार नाराजी देखील व्यक्त केली. ९७ % लोकांनी मात्र कॉल करून उपक्रमाची प्रशंसा केली.त्यामुळे आमच्या वेबपोर्टलच्या स्टाफने समाधान व्यक्त केले आहे.
आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,या पक्षाच्या अनेकांशी मुलाखतीसाठी सकाळपासून प्रयत्नात होतो,पण एकाही पदाधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही.अनेकांनी तर आमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही,असे सांगत आमच्या प्रयत्नाला वाटण्याच्या अक्षता लावल्या.या सर्व घडामोडीनंतर आम्ही त्या पक्षाच्या असंतुष्ट आत्म्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.आमच्या या प्रयत्नाला काही अंशी यश आले.असंतुष्ट आत्मे हे मिडीयासाठी बातम्याचे स्रोत असतात.त्यामुळे आम्ही हा फंडा सतत वापरत असतो. असाच एक असंतुष्ट आत्मा आमच्या गळाला लागला. महत्वाची अट घालत आपली मुलाखत दिली.ती आम्ही जशीच्या तशी प्रसिद्ध करत आहोत.
प्रश्नावली,
News 27. In – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणूका लढवण्यासाठी पक्षाची कशी तयारी आहे.ही निवडणूक,महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार की ” एकला चलो रे,” अशी भूमिका अवलंबणार ?
काँग्रेस माजी पदाधिकारी – या प्रश्नाचे उत्तर काय देऊ ? असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला आहे.कारण गेल्या तीन दशकात ( १९९० – २०२५ ) पक्षाची झालेली वाताहत पाहता या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवू शकत नाही,हे मान्य आम्हाला करावेच लागेल.महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन आम्ही निवडणुकीच्या रिंगणात असू,पण किती जागा लढवू सांगणे जरा कठीणच आहे
News27.in – तुम्हाला ही निवडणूक स्वबळावर लढवणे शक्य नाही.तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना ( उबाठा ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) या दोन्ही पक्षाची अवस्था अत्यंत बिकट आहे.त्यामुळे त्यांना सोबत घेण्याशिवाय तूमच्यासमोर अन्य पर्याय नाही.
काँग्रेस माजी पदाधिकारी – तुमचे म्हणणे वास्तवाला धरून आहे.एकेकाळी ज्या पक्षाला येथील मतदारांनी भरभरून दिले.ते मतदार या राष्ट्रीय पक्षाला आता दारातही उभे करायला तयार नाहीत.अशी परिस्थिती का निर्माण झाली ? यावर एकाही राष्ट्रीय नेत्यांने अंतर्मुख होऊन कधीही विचार केला नाही.त्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची फळी पार विस्कळीत झाली.
News27.in – आज तुमच्या पक्षाचे अस्तित्व नाममात्र उरले आहे.अशा परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक कशी लढवणार ? तुम्हाला काय वाटते ?
काँग्रेस माजी पदाधिकारी – तुमचे म्हणणे खरं आहे,कारण भाजपचा वाढता प्रभाव व महाविकास आघाडीत असलेले मतभेद,अशा दोन कारणामुळे या निवडणुका एकत्रितपणे आम्ही लढू,असे मला तरी वाटत नाही.गेल्या विधानसभा निवडणुकीत नालासोपारा विधानसभा मतदारसंघ ही जागा शिवसेनेला ( उबाठा ) द्यायला हवी होती.पण प्रदेशाध्यक्षानी आपल्या माणसाची वर्णी लावण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.ज्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली, त्याला मतदारसंघात कुत्रं देखील ओळखत नव्हतं.त्यामुळे जे काही व्हायचे होते,तेच झाले.निकालानंतर आम्हाला तोंड दाखवायलाही जागा उरली नाही.आमच्याकडे पक्षापेक्षा ” आपला माणूस,” ही जी संस्कृती उदयाला आली आहे.ती पक्षाच्या अधोगतीला कारणीभूत ठरली आहे.
News27.in – उद्धव ठाकरे व राज ठाकरे,या दोघांनी एकत्र येण्याचे ठरवले तर निवडणुकीची समीकरणे बदलतील, असे तुम्हाला वाटते का ?
काँग्रेस माजी पदाधिकारी – ठाकरे बंधुची युती झाल्यास काँग्रेस हा महाविकास आघाडीत राहील,असे वाटत नाही.या दोघा भावांची धोरणे सेक्यूलर पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेस पक्षाचा पायाच उखडला जाईल. आम्ही त्यांच्या सोबत गेलो तर अल्पसंख्यांक समाजात चुकीचे संकेत जातील व पक्ष रसातळाला जाईल.
News27.in – महानगरपालिकेच्या गेल्या दोन निवडणुकामध्ये तुमच्या पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.यंदा त्याचीच पुनरावृत्ती होईल,असे तुम्हाला वाटते का ?
काँग्रेस माजी पदाधिकारी – तशीच पुनरावृत्ती होईल,असे वाटते.एकामागोमाग पराभव होऊनही आम्ही अंतर्मुख होऊन करायला तयार नाही.चुका दुरुस्त करून पक्षाला उभारणी करण्याचे आमच्याकडून होत नाही.पक्षाची देश व राज्यात वाताहत होऊनही आम्ही गटबाजी व जातीधर्माच्या चौकटीतून बाहेर पडायला तयार नाही.त्यामुळे पराभव हा आमच्या पाचवीला पूजला आहे.
News27.in – विधानसभा निवडणुकीत पक्षाला जो फटका बसला,तसेच भाजपचा त्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय झाला.मतांची असलेली तफावत भरून काढणे महाविकास आघाडीला शक्य होईल का ?
काँग्रेस माजी पदाधिकारी – बिलकुल नाही,कारण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीच्या घटक पक्षाची मने पार दुभंगली गेली आहेत.घटक पक्षांची ताकद नगण्य असतानाही जागावाटपामध्ये जी खेचाखेची होत असते.ती लक्षात घेता आम्ही भाजपच्या आसपास परिसरात पण फिरकू शकणार नाही.त्यामुळे मतांची तफावत भरून काढणे,हे सारे येथे गैरलागू ठरते.
News27.in – अनेक जुने पदाधिकारी सध्या पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून दुरावल्याचे पाहायला मिळते,अशी परिस्थिती का निर्माण झाली,तुम्हाला काय वाटते ?
काँग्रेस माजी पदाधिकारी – पक्षात पूर्वी जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे प्रमुख पदाधिकारी वार्षिक अहवाल प्रदेशाला सादर करत असत.हल्ली स्वयंघोषित नेते कोणतेही पक्षकार्य न करता आपले वैयक्तिक कार्य अहवाल सादर करू लागले आहेत.ही चूकीची प्रथा सुरू झाली असुन ती पक्षासाठी हानिकारक ठरली आहे.त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ते पक्षापासून दुरावले गेले.पक्षाची सदस्यसंख्या वाढवणे व पक्षाचे उपक्रम राबवणे,हे सारे आता भूतकाळात जमा झाले आहे.
News27.in – शेवटचा प्रश्न या निवडणुकीत तुमच्या पक्षाला किती जागा जिंकणे होईल.तसेच बहुजन विकास आघाडी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,शिवसेना ( उबाठा ) व तुम्ही चौघांनी एकत्रितपणे निवडणुका लढवायचे ठरवले तर भाजपला फटका बसू शकतो का ? तुम्हाला काय वाटते ?
काँग्रेस माजी पदाधिकारी – भाजपला नाहीतर आम्हाला फटका बसू शकतो.कारण परस्पर विचारसरणी असलेल्या पक्षाचे एकत्र येणे, येथील मतदारांना पटणारे नाही.मनसे हा अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात राजकारण करणारा पक्ष आहे. मुस्लिम,ख्रिस्ती हे अल्पसंख्यांक व बिहारी,उत्तर भारतीय व गुजराती हे परप्रांतीय समाज अशा आघाडीला कधीही थारा देणार नाहीत.उलट अशी आघाडी झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होऊ शकतो.

