दीपक मोहिते,
वसई विरार शहर मनपा निवडणूक ; आता फार कठीण आहे,कारण पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे,ते पुन्हा मागे वळू शकणार नाही….
गेल्यावर्षी मे महिन्यात लोकसभा व डिसें.महिन्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या.लोकसभा निवडणुकीचा निकाल जसा अपेक्षित होता,तसाच तो लागला.पण विधानसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील राजकीय विषश्लेकांचे डोळे पांढरे झाले.ज्या वसई,नालासोपारा विधानसभा मतदारसंघावर गेली तीन दशके बहुजन विकास आघाडीचे साम्राज्य होते.ते या विधानसभा निवडणुकीत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले.या गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बोईसर मतदारसंघात ज्या बविआने बाजी मारली,तोही त्यांच्या हातून निसटला.या तीनही जागा महायुतीने प्रचंड मताधिक्य घेत जिंकल्या.( वसई व नालासोपारा – भाजप/ बोईसर – शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) अशी राजकीय स्थिती निर्माण झाली.बहुजन विकास आघाडीचा झालेला पराभव हा नक्कीच तुम्हा – आम्हा सर्वाना बुचकळ्यात टाकणारा होता.या पराभवाने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या पार खचून गेले आहेत.गेले सहा महिने पक्षात निरव शांतता असुन वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही हालचाल दिसत नाही.पूर्वी दर आठवड्यात दोन ते तीन उपक्रम राबवण्यात येत असत.यंग स्टार ट्रस्टच्या माध्यमातून हे उपक्रम होत असायचे,ते उपक्रमही आता भूतकाळात जमा झाले आहेत.एकेकाळी तरुणांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या बहुजन विकास आघाडीमध्ये इतकी मरगळ येऊ शकते,यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.पण दुर्देवाने तशी परिस्थिती निर्माण झाली आहे.झालेला पराभव,त्यामागची कारणे,नेते व पदाधिकाऱ्याचे गाफिल राहणे किंवा पक्षात निर्माण झालेली निष्क्रियता व वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यामुळे आलेला सुस्तपणा,या सगळ्याचा कडेलोट झाल्यामुळे मतदारांनी पक्षाकडे पाठ फिरवली,असा आमचा अंदाज आहे.या सर्व घडामोडीचा शोध घेण्याचा आमच्या news 27.in वेबपोर्टलने शोध घेण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी अनेक पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे विविध सहकारी यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. पण याविषयी कोणाकडूनही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे विश्वासू सहकारी व माजी महापौर नारायण मानकर यांच्याशी आम्ही संपर्क साधला,पण ते सध्या पाठदुखीने आजारी असल्यामुळे त्यांनी याविषयी आपली असमर्थता दाखवली.त्यामुळे आम्ही आ.ठाकुरांचे एकेकाळी निकटवर्तीय असलेले,त्यांच्या सुखदुःखात कायम सहभागी असणाऱ्या व सध्या त्यांच्यापासून दुरावलेल्या राजकीय नेत्याची मुलाखत घेण्याचे ठरवले.त्यांनीही माझे नांव छापू नका,या अटीवर आम्हाला मुलाखत देण्याची तयारी दाखवली.त्यानुसार आम्ही त्यांची मुलाखत प्रसिद्ध करत आहोत.त्यांची ही मुलाखत खळबजनक अशी असुन,या मुलाखतीमुळे वसई तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात वादळ उठण्याची शक्यता आहे.
प्रश्नावली,
news27.in – लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बविआची कितपत तयारी आहे ? ही निवडणूक हा पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार की या निवडणूकीतही ” एकला चलो रे,” अशी त्यांची भूमिका असणार ?
माजी पदाधिकारी – बहुजन विकास आघाडी हा पक्ष निवडणुकीला चार महिने शिल्लक असतांना कामाला लागतो.साडेचार वर्षे पक्षाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते निवांत असतात.यावेळीही ते तसेच निवांत आहेत.पूर्वी लोकांसमोर पर्याय नव्हता, त्यामुळे बहुजन विकास आघाडीला भरभरून मतदान होत असे.पण गेल्या तीन ते चार वर्षात लोकांना भाजपचा पर्याय मिळाला व राज्यभरात नावारूपाला आलेल्या बहुजन विकास आघाडीचे होत्याचे नव्हते झाले.या अनुभवातून त्या पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी शहाणे होतील,अशी अपेक्षा होती, पण तसे होताना दिसत नाही.
news 27.in – या निवडणुकीत त्यांनी जर वेगळी चूल मांडायचे ठरवले तर त्याचा फायदा भाजप व शिवसेनेला ( एकनाथ शिंदे गट ) होणार नाही का ? तुम्हाला काय वाटते ?
माजी पदाधिकारी – पक्षाची सध्याची परिस्थिती किंवा अवस्था लक्षात घेता व त्यांनी ” एकला चलो रे,” अशी भूमिका घेतल्यास पक्षाचा शंभर टक्के कपाळमोक्ष होईल आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो.
news27.in – प्राप्त राजकीय परिस्थिती लक्षात घेता इतर समविचारी पक्षाशी आघाडी करून निवडणूक लढवण्या संदर्भात त्यांचे प्रयत्न सुरू आहेत का ?
माजी पदाधिकारी – यांच्या तुलनेत इतर एकही पक्ष समविचारी होऊ शकत नाही. मताची विभागणी होऊ नये, यासाठी त्यांचे एकत्र येणे वगैरे ठीक आहे.या एकत्र येण्याला आपण समविचारी पक्षाचे एकत्र येणे,असे म्हणणे चुकीचे ठरेल.बदलत्या राजकारणामुळे एकत्र येण्याची ही एक प्रक्रिया असेच म्हणावे लागेल.
news27.in – महानगरपालिकेच्या मागील दोन निवडणुकामध्ये या पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला होता.या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल,असे तुम्हाला वाटते का ?
माजी पदाधिकारी – बिलकुल नाही,कारण पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. पाणी माघारी वळण्याची शक्यता फार कमी आहे.या पक्षाचा एक पदाधिकारी निवडणुकीच्या काळात युट्युबर व लोकल दैनिकांना हाताशी धरून सातत्याने मतदारांची फसवणूक करत आला.लोकांसमोर पर्याय नसल्यामुळे लोकही या बनवाबनवीला बळी पडत गेले.पण आता तशी स्थिती नाही.कारण प्राप्त परिस्थितीत भाजपदेखील अशा बनवाबनवीमध्ये माहीर आहे.त्यामुळे त्यांना निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत.
news27.in – लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांना जो फटका बसला,तसेच त्या निवडणुकीत भाजपचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला.मतांमध्ये असलेली तफावत भरून काढणे, पक्षाला शक्य होईल का ?
माजी पदाधिकारी – अशक्य आहे,कारण भाजप त्यांची डाळ शिजू देणार नाही.ते व शिंदे गट,निवडणूक कशा पद्धतीने लढवायची,यामध्ये तरबेज आहेत.समोरच्या विरोधकाला नामशेष करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.या निवडणुकीच्या तोंडावर भाजप व शिंदे गटाचे नेते फोडाफोडीच्या राजकारणाला हवा देतील.यांच्या पक्षाच्या नेत्यांना फोडण्यासाठी ही मंडळी थैल्या मोकळ्या करतील.खोके व पेट्याच्या षडयंत्राचे थैमान पुन्हा सुरू होईल.त्यामुळे मतांची तफावत भरून काढणे,हा प्रकारच खोके व पेट्याच्या कडीकुलपात बंद होईल.
news27.in – सुरुवातीचा काळ ( सुमारे तीन दशके ) बहुजन विकास आघाडीसाठी सुगीचा काळ होता.पण गेल्या पाच वर्षांत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये एकप्रकारची मरगळ आली व पक्ष क्षीण होत गेला.आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे,एकमेकांशी असलेला संवाद तुटणे व मतदारांना गृहीत धरणे,इत्यादी कारणे, या पराभवाच्या मागे असावीत,असे तुम्हाला वाटते का ? अशा परिस्थितीमध्ये पक्षाला पुन्हा उभारी मिळेल का ?
माजी पदाधिकारी – पडत्या काळात जे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत होते.आज त्यापैकी अनेकजण बाजूला झाले आहेत.आज महानगरपालिकेची अवस्था पहा जरा,गेल्या १५ वर्षात अब्जावधी रु.खर्च झाले,पण क्षेत्र बाळसं धरू शकले नाही. पाणी,आरोग्य,शिक्षण व वैद्यकीय सेवा,इ.क्षेत्रात अक्षरशः बजबजपुरी पाहायला मिळते.पाणीपुरवठा योजना व एसटीपी उभारणे,यावर झालेल्या खर्चाची जर ईडीने चौकशी केल्यास या पक्षाचे काही प्रमुख नेते १०० % गजाआड होऊ शकतात.
news27.in -गेल्या पाच ते दहा वर्षात बहुजन विकास आघाडीमध्ये गटबाजीला ऊत आला आहे.त्याची अनेक उदाहरणे सांगता येतील.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर पक्षावर अशाप्रकारची नामुष्की आली नसती.वरिष्ठ नेत्यामधील शीतयुद्धामुळे कार्यकर्त्यांची कूचंबणा होत असते.याविषयी तुम्हाला काय वाटते ?
माजी पदाधिकारी – पक्षाच्या अनेक नेत्यांनी खालच्या पातळीवर काय चालले आहे, याची कल्पना प्रमुख नेत्यांना कधीच येऊ दिली नाही व या नेत्यांनीही कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही.त्यामुळे पक्षाची अवस्था बिकट होत गेली.इन्व्हेन्ट करत अनेकांनी पक्षाची अक्षरशः फसवणूक केली.पक्षाशी नवीन कार्यकर्ते जोडण्याचा इंव्हेट आजवर कधीच झाला नाही. नगरसेवक व कार्यकर्त्यांसाठी पक्षाने कार्यशाळा घेतल्याचे तुमच्या कधी ऐकण्यात आले का ? कार्यशाळा व एकमेकांशी संवाद,हे शब्द त्यांच्या शब्दकोषात नाहीत.त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
news 27.in – अनेक जुने पदाधिकारी सध्या पक्षापासून दुरावत चालले आहेत.अशी परिस्थिती का निर्माण झाली ? याविषयी नेत्यांना आत्मचिंतन करावे,असे का वाटले नाही ?
माजी पदाधिकारी – माझेच उदाहरण घ्या.मी किती काळ माजी आ.ठाकूर यांना साथ दिली ? पडत्या काळात सोबत राहिलो,त्याबदल्यात मला काय मिळाले ? मी बाजूला झालो,पण अनेक जण आजही सहन करत पक्षात टिकून आहेत.स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करणे,हे आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवले नाही.त्यामुळे माझ्यासारखी व्यक्ती, ” आपले काम भले व आपण भले,यानुसार आता जगत आहोत.
news27.in – पराभवाने खचलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुन्हा प्राणवायू देण्याचे काम ज्येष्ठ नेत्यांकडून होणे,अपेक्षित आहे.तसेच महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत बहुजन विकास आघाडी पैकीच्या पैकी जागा लढवणार का ? तुम्हाला काय वाटते ?
माजी पदाधिकारी – आता ते शक्य नाही.ते पैकीच्या पैकी जागा लढवतील,पण त्या जागा जिंकणे,त्यांना शक्य होणार नाही.पक्षाचे काही नेते महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्याची पोपटपंची करत आहेत,पण ते ” मुंगेरीलाल के हसीन सपने,” पाहत आहेत.वरिष्टांची दिशाभूल करण्याचा हा फंडा आहे.पण अशा या फंडामुळे पक्षाचे मात्र अतोनात नुकसान झाले.
news27.in – या निवडणुकीत पक्षाला किती जागा जिंकणे शक्य आहे.तसेच बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी या दोघांनी एकत्रितपणे निवडणुका लढवायचे ठरवले तर भाजपला फटका बसू शकतो का ? तुम्हाला काय वाटते ?
माजी पदाधिकारी – बिलकुल नाही,भाजपला आता कोणी फटका देऊ शकत नाही.कारण त्यांनी निवडणुकीसाठी उभी केलेली यंत्रणा आजच्या घडीला एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे त्यांना फटका बसण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
news27.in – शेवटचा प्रश्न,
गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत हा प्रश्न असुन तुम्ही एकेकाळी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी होता,या पराभवाच्या मागची नेमकी कारणे काय आहेत ? त्याविषयी तुमच्याकडून माहिती मिळावी,अशी वसई व नालासोपारा मतदारदारसंघातील तमाम मतदारांची इच्छा आहे. त्यासाठी खाली दिलेल्या प्रश्नावलीचा आपण आधार घ्यावा,अशी आमची विनंती आहे.
१ ) पक्षबांधणीकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष,
२ ) पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये समन्वयाचा अभाव,
३ ) निवडणुकीपूर्वी केवळ चार महिने आधी पक्षाचे सक्रिय होणे,
४ ) मतदाराच्या घराच्या उंबरठ्यावर जाऊन एकेकाळी मते मागणारा पदाधिकारी व कार्यकर्ता आता आर्थिकदृष्टया सक्षम झाल्यानंतर हल्ली आपल्या इनोव्हा गाडीच्या काचा खाली करून हात जोडून मते मागू लागला.हा बदल ग्रामीण भागातील मतदाराच्या मनाला पटला नाही.यामध्ये किती तथ्य आहे ?
५ ) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विवांता हॉटेल येथे घडलेला प्रकार व महिलावर्गात निर्माण झालेला असंतोष,
६ ) ऐन निवडणुकीच्या धामधूमीत ठाकूर व पाटील कुटुंबियांत निर्माण झालेला बेबनाव,
ही सहाही कारणे विधानसभा निवडणुकीतील पराभवाला नक्कीच कारणीभूत आहेत. या सहाही प्रश्नावर मी भरभरून बोलू शकतो,पण सध्या नाही,कारण माझ्या घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व विषयावर आपण निवांतपणे बोलू,

