दीपक मोहिते,
राज्यकर्त्यांचा करंटेपणा..
आपली वैद्यकीय सेवा रामभरोसे,
केंद्र व राज्य सरकार सध्या रस्तेबांधणीच्या विकासकामावर कोटी कोटीची उड्डाणे घेत आहे.शहरी भागातील अंतर्गत रस्ते बांधणी,शहराना एकमेकांशी जोडण्यासाठी आवश्यक असलेले जलदगती महामार्ग व समृद्धी महामार्ग उभारणी, असा धडक कार्यक्रम राबवत आहे.
एकेकाळी ” बंबई नगरी सबसे प्यारी,” ” बंबई मेरी जान,” ” बंबईसे आया मेरा दोस्त,” अशा प्रकारची गाणी आपण गुणगुणत असू.आज सारं काही बदलत चाललंय..आता ” बंबई नगरी,सबसे खतरी,” ” बंबई से गया मेरा दोस्त,” “बंबई मेरा दुश्मन,” असे म्हणायची पाळी आपल्यावर आली आहे.पाच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने आपल्या वैद्यकीय सेवेच्या मर्यादा स्पष्ट केल्या.गेल्या ६५ वर्षात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आपण नवीन सरकारी रुग्णालये उभारू शकलो नाही. त्याचे भयानक परिणाम कोरोनाच्या अस्मानी संकटात आपल्याला भोगावे लागले. वास्तविक हे आपल्या राज्यकर्त्यांचे अपयश आहे.केवळ कमिशनसाठी चटावलेल्या राज्यकर्त्यांनी मड्यावरच्या टाळूचे लोणी खाण्यात धन्यता मानली.
पाच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाचा सर्वाधिक फटका,या मुंबई नगरीला बसला.त्याकाळी दिवसागणिक रुग्ण वाढत होते,रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी हॉस्पिटल्स कमी पडली.त्यामुळे राज्य सरकारला स्टेडियम,मैदाने व अन्य पर्यायाचा आधार घ्यावा लागला होता.हा कटू अनुभव गाठीशी असतानाही आपल्या राज्यसरकारने गेल्या पाच वर्षात या ज्वलंत समस्याबाबत पावले उचलली नाहीत.
गेल्या सहा दशकात देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या शहरात आपल्या राज्यकर्त्यांनी एकही सरकारी हॉस्पिटल उभारले नाही.त्यावेळी या शहराची लोकसंख्या होती ३५ लाख,आज ती वाढत जाऊन अडीच कोटीवर गेली आहे.काँग्रेस असो किंवा अन्य पक्ष असो,पण एकाही पक्षाने या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.त्याचे परिणाम मात्र मुंबईकराना भोगावे लागले. अन्न,वस्त्र व निवारा सोबत वैद्यकीय सेवा देखील महत्वाची प्राथमिक गरज आहे.हे आपल्या राज्यकर्त्यांना आजवर कधीही उमगले नाही.जेथे शंभर हॉस्पिटल्सची गरज आहे,तेथे फक्त सरकारी व खाजगी विश्वस्त संस्थाची अशी एकूण १४ हॉस्पिटल्स अडीच कोटी नागरिकांचा भार उचलत आहे.ब्रिटिश राज्यकर्त्यांना या व्यवस्थेची निकड समजू शकली,पण आपले राज्यकर्ते मात्र नालायक निघाले,कारण त्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी विदेशातील हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत.पण सर्वसामान्यजनांचे काय ? ब्रिटिशांच्या काळात किती व कोणत्या साली हॉस्पिटल्स उभारण्यात आली,त्याच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया…
१) सर जे.जे.——१८४५
२) गोकुलदास तेज.१८७५
३) नायर———–१९२०
४) मुंबई डेंटल——१९२३
५) केईएम———-१९२६
६) भाटीया———-१९३२
७) टाटा————-१९४१
८) कस्तुरबा———१९४५
स्वातंत्र्योत्तर काळात-
१) सायन———–१९४७
२) सैफी————१९४८
३) राजावाडी——-१९५६
४) वि.श.गांधी–१९५८
५) भगवती———- १९६२
६) कुपर————–१९६९
लोकसंख्या ३५ लाख असताना १४ हॉस्पिटल्स तर गेल्या सहा दशकात म्हणजे २०२६ पर्यंत वाढत्या लोकसंख्येच्या या शहरात ४ सरकारी व विश्वस्त संस्थांची २ हॉस्पिटल्स,अशी केवळ ६ हॉस्पिटल्स उभारण्यात आली.हा राज्यकर्त्यांचा कपाळ करंटेपणा नाही का ?
आजच्या घडीला सर्वसामान्यजनांना न परवडणारी या नगरीतील हजारो खाजगी हॉस्पिटल्स बक्कळ पैसा कमवत आहेत,आपली पूर्वीची सरकारे मात्र गेली अनेक वर्षे डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत.

