दीपक मोहिते,
” मान्सूनचे आगमन, ”
मे अखेरीस राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता,
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून येत्या २४ तासांत ते अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या चक्रीवादळाला “शक्ती,”असे नाव देण्यात आले आहे.हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसेल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.कोकण किनारपट्टीवर ताशी ६० कि.मी.वेगाने वारे वाहतील तसेच अतिवृष्टी होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे,तर मुंबईसह उर्वरित कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२० मे पासून पूर्व मोसमी पावसाने राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.कोकणात,विशेष करून तळकोकणात गेले २ दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.पुढील ३ दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून १५ ठिकाणी अतिवृष्टी होईल,असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे.शक्ती चक्रीवादळ घोंघावत असताना मान्सूनचे वेळेआधी आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत.मे महिन्याच्या अखेरीस मान्सून कोकण किनारपट्टीवर आपले रंग दाखवण्यास सुरुवात करेल.दरम्यान,मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे.तिथीनुसार २५ मे ला रोहिणी नक्षत्र सुरू होते आणि रोहिणीचा पाऊस पडतो व तो आगामी मान्सूनचे संकेत देत असतो. पण यंदा २५ मे ला मोसमी पाऊस दाखल होईल,असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने मान्सून या आठवड्यात केरळ,कर्नाटक, गोवा,महाराष्ट्रातील कोकण व आपल्या शेजारी असलेल्या गुजरात राज्यात धडकणार आहे.या सर्व ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मान्सून केरळात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातही मान्सून एक आठवडा आधीच येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.समुद्रकिनारी भागात वातावरणात झपाट्याने होणारे बदल लक्षात घेता यंदा कोकण विभागातील मुंबई,पालघर,ठाणे व रायगड जिल्ह्यातील नागरिकांना जुनच्या पहिल्या आठवड्यात वादळ व अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे. याकाळात समुद्रात वादळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता असुन मच्छिमारांनी या काळात मासेमारीसाठी खोल समुद्रात जाणे टाळावे,असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

