दिपक मोहिते,
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) पालघर जिल्ह्यातील अस्तित्व नगण्य,
काल आपण मुलाखतीच्या पहिल्या भागात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ( एकनाथ शिंदे गट ) निलेश तेंडुलकर यांची मुलाखत घेतली.त्यानंतर काल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार ) गटाच्या जिल्हाध्यक्षांची मुलाखत घेण्यासाठी दिवसभर आटोकाट प्रयत्न करत होतो,पण आमच्या या प्रयत्नाला त्या पक्षाकडून यत्किंचितही प्रतिसाद मिळाला नाही.तो का मिळू शकला नाही,हे आजच्या मुलाखतीमधून स्पष्ट होणार आहे.दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतर सांयकाळी एक आशेचा किरण आम्हाला दिसला.शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याने news27.in ला कॉल करून,माझे नाव न छापण्याच्या अटीवर मी मुलाखत देण्यास तयार असल्याचे कळवले.त्यास आमच्या वेबपोर्टलने मंजुरी दिली.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कशा पद्धतीने काम चालते ? तसेच प्रामाणिक कार्यकर्ता कसा बाजूला फेकला जातो व नव्याने पक्षात आलेल्याना पदांची कशी खिरापत वाटली जाते,या ज्वलंत विषयी मी प्रकाशझोत टाकणार आहे.तसेच महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत अजित पवार गट किती जागा लढवतो व पक्षाचे किती उमेदवार आपल्या अनामत रकमा वाचवतात यावर मी बोलणार आहे.त्यांच्या सर्व अटी मान्य करून त्यांची ही निनावी प्रकट मुलाखत आम्ही प्रसिद्ध करत आहोत.
news27.in – तुम्ही व शिंदे गट,हे दोघेही महायुती सरकारमध्ये असले तरी पालघर व ठाणे जिल्ह्यात तुमचे अस्तित्व नगण्य आहे,हे तुम्हाला मान्य आहे का ?
अज्ञात माजी पदाधिकारी – तुमचे म्हणणे हे १०० % खरे असून आमच्या नेत्यानी या दोन्ही जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षात पक्षबांधणीकडे कधीही लक्ष दिले नाही.त्यामुळे काही किरकोळ अपवाद वगळता आम्हाला लोकसभा व विधानसभा तर सोडाच,पण साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवणे शक्य झाले नाही.सध्याही पक्षाची परिस्थिती तशीच आहे.पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच उपलब्ध नाहीत.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची पाटी कोरीच राहील,असे वाटते.
news27.in – येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत.तर तुमचा पक्ष किती जागा लढवू शकतो ?
अज्ञात माजी पदाधिकारी – या दोन्ही जिल्ह्यात आमच्या पक्षाची ताकद लक्षात घेऊन भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) महानगरपालिकेच्या एकूण ११५ जागांपैकी केवळ सात ते आठ जागा देतील,असे वाटते.पण आमचे दुर्देव असे की या सात किंवा आठ जागा लढवण्यासाठी आमच्याकडे तेवढेही उमेदवार नाहीत.त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या रिंगणात असू की नसू हे देखील या घडीला सांगू शकत नाही.या दोन्ही जिल्ह्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या औषधालाही शोधून सापडत नाहीत.
news27.in – पक्षाची ही जी दारुण अवस्था झाली आहे,त्यामागची काय कारणे आहेत.प्रत्येक पक्ष राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करत असतो.पण तुमच्या पक्षाने हे दोन्ही जिल्हे वाऱ्यावर सोडून दिले आहेत.यामागची नेमकी कारणे काय आहेत ?
अज्ञात माजी पदाधिकारी – पालघर जिल्ह्यात आ.ठाकूर यांच्याशी असलेले साटेलोटे व ठाणे जिल्ह्यात पक्षाची धुरा ज्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आली होती,त्या आव्हाडांनी आपले महत्व व वर्चस्व कमी होऊ नये,पक्षाला उभारी मिळू नये,यासाठी प्रयत्न केले.पालघरच्या ग्रामीण भागात आनंद ठाकूर यांनी देखील तेच केले.त्यामुळे पक्ष कधीही बाळसं धरू शकला नाही.शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले जितेंद्र आव्हाड हे पक्ष फुटीनंतर शरद पवारासोबत राहिले.त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्व असून नसल्यासारखे झाले आहे.पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हे आनंद ठाकूर यांच्याकडे असून ते आजवर पक्षाचे चेहरा बनू शकले नाही.पक्षाच्या पिछेहाटीमागची ही खरी कारणे आहेत.
news27.in – पक्षाची ही दयनीय अवस्था लक्षात घेता,तुमचा पक्ष,यंदा होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवेल,असे तुम्हाला वाटते का ?
अज्ञात माजी पदाधिकारी – पक्षाच्या वरिष्ठांना केवळ प.महाराष्ट्रातील निवडणुका लढवण्यात स्वारस्य आहे.या निवडणुकीत पक्षाचे वरिष्ठ नेते हे दोन्ही जिल्हे,एकानाथ शिंदे गट व भाजपच्या घश्यात घालतील,असे वाटते.त्याबदल्यात राज्य पातळीवर ते काहीतरी पदरात पाडून घेतील.आपल्याकडे उमेदवार नाहीत,पक्षाची ताकद नाही,त्यामुळे निवडणुका लढवून हसं करून घेण्यापेक्षा ” झाकली मूठ सव्वा लाखाची,” या म्हणीनुसार शांत बसण्यात ते धन्यता मानतील,असे वाटते.
news27.in – पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचे हे धोरण,पक्षाला हानिकारक आहे,असे तुम्हाला वाटत नाही का ?
अज्ञात माजी पदाधिकारी – आम्हाला काय वाटते ? याला या पक्षात काडीची किंमत नाही.या प्रक्रियेत स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आमच्यासारख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठे नुकसान आहे.पण या पक्षात स्थानिक पातळीवर काम करणाऱ्यांना कुत्रं देखील विचारत नाही.त्यामुळे आमच्यासारखे पदाधिकारी देखील जे चाललंय ते उघड्या डोळ्याने पाहत राहायचे,अशा निर्णयाप्रत आलो आहोत.
news27.in – भविष्यात या परिस्थितीत बदल होईल,असे वाटते का ?
अज्ञात माजी पदाधिकारी – तशी शक्यता फार कमी आहे.कारण वरच्या लोकांचे सार काही व्यवस्थित चालले आहे.त्यांना आमदारकी,मंत्रीपदे खोऱ्यानी मिळत आहेत.त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना फारसा इंटरेस्ट नाही.त्यामुळे बदल तर अपेक्षित नाहीच,पण पक्षाची आणखी दुर्दशा होण्याची शक्यता अधिक आहे.

