दीपक मोहिते,
” असंवेदनशीलता,”
रुपाली चाकणकर यांच्या कार्यकिर्दीत महिलांना न्याय मिळू शकणार नाही…
वैष्णवी हगवणे,मृत्यूप्रकरणी आपले सरकार व महिला आयोगाच्या अध्यक्षा किती असंवेदनशील आहेत,हे त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून स्पष्ट झाले आहे.घटना घडल्यानंतर तब्बल सात दिवसानंतर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वैष्णवी यांच्या माहेरच्या लोकांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जातात.हा प्रकारच मुळात संतापजनक आहे.वैष्णवी हगवणे यांचे सासरे व त्यांची मुले हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबधित आहेत.त्यामुळे घटना घडल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी सरकार व महिला आयोगाने वेळकाढूपणाचे धोरण स्विकारले होते.सदर प्रकरणी मीडिया व विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते, महिला आयोगाच्या अध्यक्षा व पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्या.
मिडियाने अजित पवार हे त्यांच्या विवाहप्रसंगी आवर्जून उपस्थित होते,हे दाखवल्यानंतर अजित पवार व त्यांचे शिलेदार भानावर आले व त्यांनी राजेंद्र हगवणे यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली.वास्तविक ही घटना घडल्यानंतर महिला आयोगाने जलदगतीने गुन्हा दाखल करण्याची गरज होती.पण आयोग नेहमीप्रमाणे निष्क्रिय राहिला.त्यानंतर सर्वत्र गदारोळ उठल्यानंतर राज्याचे तडफदार मुख्यमंत्री फडणवीस साहेब नेहमीच्या प्रथेनुसार वृत्तवाहिनीसमोर आले व त्यांनी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली,” या प्रकरणातील एकाही दोषीला सरकार सोडणार नाही.पोलिसांना योग्य ते आदेश देण्यात आले असून पोलीस योग्य पद्धतीने काम करत आहे.” असे नेहमीचे पालुपद लावण्यात धन्यता मानत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेंव्हा हे ऊर बडवून सांगत होते,त्याचवेळी वैष्णवीचे सासरे व त्यांचा मुलगा एका धाब्यावर मटनावर ताव मारत होते.गेल्या तीन वर्षात राज्यात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये सरकारचे गृहखाते पुरते बदनाम झाले आहे.बदलापूर बलात्कार व त्यामधील आरोपीचे एन्काऊंटर,प्रकरणी सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली.या
एन्काउंटर घटनेतील पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आता न्यायालायाने दिले आहेत.या घटनेतील पोलीस अधिकाऱ्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना पेढे भरवणारे खा.नरेश म्हस्के व एका राजकीय नेत्यांची पत्नी हे दोघेही अक्षरशः तोंडघशी पडले.अपप्रवृत्तीला साथ देणाऱ्या या लोकांवर न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.काल आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर वैष्णवी यांच्या माहेरच्या लोकांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असताना छावा,मराठा संघटनाचे पदाधिकारी व पत्रकारांनी त्यांना घेरले.आपल्या निष्क्रीयतेमुळे अनेकदा अडचणीत आलेल्या चाकणकर यांची त्यांना सामोरे जाताना बोबडी वळाल्याचे पाहायला मिळाले.चाकणकर यांनी सर्वप्रथम महिला आयोग ही शोभेची वस्तू नाही,हे समजायला हवे.समाजातील महिलांना न्याय देणारी ती स्वायत्त संस्था आहे,याची जाणीव ठेवायला हवी.मात्र जोवर या आयोगाच्या अध्यक्षपदी त्या कार्यरत असतील,तोवर राज्यातील महिलांना न्याय मिळेल,असे वाटत नाही.

