दीपक मोहिते,
करदात्यांच्या जीवाशी खेळ,
धोकादायक इमारती ; यादी प्रसिद्ध करणे,केवळ एक सोपस्कार…
” नेमेची येतो पावसाळा,” या युक्तीनुसार वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने यंदाही धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे.दरवर्षी मान्सुनच्या तोंडावर अशाप्रकारची यादी प्रसिद्ध करून मनपा प्रशासन कोणाचे व कसले हित साधत असते,हे कळायला मार्ग नाही.
मनपा प्रशासन दरवर्षी आपल्या हद्दीतील धोकादायक इमारतीच्या नावाची यादी जाहीर करत असते.तसेच अशा इमारतीमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीसाही बजावते.पण रहिवाशी या नोटीसाना केराची टोपली दाखवतात. कारण या महानगरपालिका क्षेत्रात पर्यायी व्यवस्था ( संक्रमण शिबीर ) नसल्यामुळे रहिवाशी आपल्या इमारती रिकाम्या करत नाहीत.तसेच या रहिवाश्यानी इमारती रिकाम्या कराव्यात,यासाठी प्रशासन देखील आग्रही नसते,कारण या रहिवाश्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था आपण करू शकत नाही,याची जाणीव अधिकाऱ्यांना पण आहे.त्यामुळे एक सोपस्कार म्हणून अधिकारी नोटीसा बजावणे,अशा धोकादायक इमारतींची यादी जाहीर करणे,आदी कामे करत असतात.
आजच्या घडीला वसई विरार शहर मनपा क्षेत्रात सुमारे १५० ते २०० धोकादायक इमारती उभ्या आहेत.या अशा धोकादायक इमारतीमध्ये शेकडो कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

