दीपक मोहिते,
नायगाव – चंद्रेपाडा गावात ” पाणी बचत,” चे यशस्वी मॉडेल,
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस तळ गाठणारा चंद्रपाड्याचा पाझर तलाव यंदा मे महिन्याच्या अखेरीसही एक महिना पुरेल इतका पाणीसाठा टिकवून आहे.ही कामगिरी ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनबद्ध कारभारामुळे शक्य झाले आहे.
दरवर्षी चंद्रपाडा व आजुबाजूच्या परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो.
नायगाव पूर्वेस असलेल्या चंद्रपाडा परिसरात गेल्या काही वर्षात लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली.त्याचा परीणाम पाणीपुरवठ्यावर होत असतो.पाऊस पडेपर्यंत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागते.तर शेकडो नागरी संकुलाना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदा स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार लोकरे यांच्या नेतृत्वाखाली या भीषण समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात आल्या.यंदा ग्रामपंचायतीने ” थोडं-थोडं,पण पुरेसं,” या तत्त्वावर काम करत दर १५ मिनिटांनी पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.यापूर्वी दीड तास होणारा पाणीपुरवठा कमी करून नियोजनबद्ध पद्धतीने कमी वेळेत अधिक घरांपर्यंत पाणी पोहचवण्यावर भर देण्यात आला.विशेष म्हणजे नागरिकांनीही या उपक्रमाला चांगले सहकार्य केले.त्यामुळे योजनेला मोठे यश मिळाले.दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या चंद्रपाड्याला यंदा दिलासा मिळाला आहे.ग्रामस्थांनी पाणीबचतीसाठी जागरूक भूमिका घेतल्याचे लोकरे यांनी सांगितले.पंचक्रोशीतील नागरिकांनी समजूतदारपणा दाखवत आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला.त्यामुळे यंदा पाणीटंचाईची दाहकता जाणवली नाही,” असे समाधान व्यक्त करत ग्रामविकास अधिकारी लोकरे यांनी पुढील वर्षीही हे मॉडेल राबवणार असल्याचे स्पष्ट केले.

