दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वादग्रस्त भुजबळ यांना ओबीसी समाजाने तारले,
राज्याचे वादग्रस्त नेते छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल मंत्रीपदावर वर्णी लावल्यामुळे भुजबळ यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.हा निर्णय घेताना अजित पवार यांनी नैतिकता गुंडाळून ठेवत,त्यांची माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जागी वर्णी लावली आहे.या घटनेचे वर्णन करायचे झाल्यास एक वादग्रस्त बाहेर पडला,तर दुसरा वाजतगाजत त्याच्या मंत्रीपदावर विराजमान झाले,असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टोळीत स्वतः अजित पवार,खा.सुनील तटकरे, खा.प्रफुल्ल पटेल,हसन मुश्रीफ,माणिकराव कोकाटे,व आता छगन भुजबळ यांची वर्णी लावून त्यांनी भ्रष्ट राजकीय नेत्यांचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे.अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे हे दोघेही भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत आकंठ बुडाले आहेत.त्यामुळे त्यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा मिठी मारल्याबाबत आपण फार काही आश्चर्य वाटून घेता कामा नये.भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांच्या गटाने या सर्व महाभागांना सामावून घेतले आहे.भाजपने देखील गेल्या काही वर्षात अशोक चव्हाण,नारायण राणे या वादग्रस्त नेत्यांसह अनेकांना भाजपमध्ये सामावून घेतले आहे.धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ यांना संधी देऊन अजित पवार यांनी ” हम भी कुछ कम नही,” हे दाखवून दिले आहे.विधानसभा निवडणुकीनंतर भुजबळ यांच्या नशिबी उपेक्षा आली होत.त्यांना मंत्रीपदाची संधी न मिळाल्यामुळे त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते.त्यानंतर आता अचानक त्यांची महायुतीला गरज का भासली,असा प्रश्न तुमच्या आमच्यासमोर उभा ठाकला असणार.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ( महानगरपालिका,
नगरपरिषदा,नगरपंचायती,जिल्हा परिषदा,पंचायत समित्या ) ओबीसी मतदारांकडून दगाफटका होऊ नये,यासाठी भुजबळ यांना महायुतीने पुन्हा मांडीवर घेतले आहे.मराठा समाजाचे नेते जरांगे यांच्या
झंझावाताचा भुजबळ यांनी यशस्वी मुकाबला केला होता.भुजबळ यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू शकले नाही.ओबीसी समाजावर असलेली त्यांची पकड लक्षात घेऊन अजित पवार यांनी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली आहे.मात्र भुजबळ यांची दुसरी काळी बाजू ही महायुतीला फटका देणारी ठरू शकते.

