दीपक मोहिते,
अस्मानी संकट,
अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक व्यवसाय डबघाईला,
गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने सुमारे अडीच हजार हे. जमिनीवरील कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले.तर पाचशेहून अधिक वीटभट्ट्या आणि पन्नास ते साठ मिठागर मालकांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.
तसेच या नैसर्गिक संकटातून मच्छिमारही सुटू शकले नाहीत.डहाणू तालुक्यातील डहाणू,धाकटी डहाणू,चिंचणी व बोर्डी येथील दहा मासेमारी बोटींचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटात सुक्या मासळी व्यवसायासह मच्छिमारांचे साठ कोटी रु.चे आर्थिक नुकसान झाले आहे.
पालघर जिल्ह्यात शेतकरी, बागायतदार,मच्छिमार, वीटभट्टी व मिठागर व्यवसाय मोठ्याप्रमाणात करण्यात येतो.ऐन उत्पादनाच्या हंगामात वळवाचा पाऊस झाल्यामुळे मीठ उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. केळवे मीठ उत्पादक सोसायटीच्या सुमारे साडेतीनशे एकरवर अलेल्या संजीवनी मिठागराचे सुमारे एक कोटी रु.चे नुकसान झाले आहे.तर जिल्ह्यातील बाराशे एकरवरील मिठागरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.या अवकाळी पावसाने धाकटी डहाणू बंदरात नांगरलेल्या मासेमारी बोटींपैकी एक बोट पूर्णपणे निकामी झाली.तर उर्वरित अकरा बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक बोटीला चार-पाच लाख रुची दुरुस्तीखर्च करावा लागणार आहे.मासेमारी हंगामातील मासेमारीचे अखेरचे दिवस हातून गेल्यामुळे मच्छीमारांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.धाकटी डहाणूसह जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारपट्टीवर ओलांड्यावर सुकण्यासाठी मासळीदेखील भिजली आहे. या नुकसानीचे आकडा चार ते पाच कोटी रु.च्या घरात असल्याचे व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे. भाजीपाला,आंबा, चिकू व इतर फळे,उन्हाळी भात अशा कृषीलागवडीचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दहा कोटी रु.ची मागणी केली आहे.

