दीपक मोहिते,
बारमाही नद्या वाहत असूनही जिल्ह्याच्या घश्याला कोरड,
दरवर्षी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना,पाणीटंचाई,
अवकाळी पाऊस,अतिवृष्टी,वादळे शेतीची हानी इ.अस्मानी संकटांना सामोरे जावे लागत असते.ही सारी संकटे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या पाचवीला पुजली आहेत.नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आलेल्या घटनेस आता एक तप पूर्ण झाले आहे.पण जिल्ह्याचे प्रश्न व समस्या आजही जैसे थे स्थितीतच आहेत.
या सर्व समस्यांपैकी दरवर्षी निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई आजही ” जैसे थे,” स्थितीत आहे.जिल्ह्यात वैतरणा,सूर्या,पिंजाळ,
तानसा व देहर्जे,या बारमाही नद्या वाहत असताना दरवर्षी जिल्ह्याच्या घश्याला मात्र कोरड पडत असते.जिल्ह्याच्या भूगर्भातही पाण्याचा मुबलक साठा आहे,पण दरवर्षी ग्रामीण भागातील विहिरी,तलाव,बंधारे मधील पाण्याची पातळी खोलवर जाते.नवा जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा यावर उपाययोजना करेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती,पण जिल्हावासीयांची घोर फसवणूक झाली.
जिल्हाप्रशासनाच्या
नाकर्तेपणामुळे लोकांना आजही हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.पालकमंत्रीपदी आलेल्या प्रत्येक मंत्र्यांने आपली बुरसटलेली मानसिकता झटकून जिल्ह्याच्या विकासात झोकून दिले असते,तर आज जिल्हा राज्याच्या नकाशावर नावारूपाला येऊ शकला असता.सूर्या, तानसा,वैतरणा या नद्या बारमाही वाहत असतानादेखील जिल्हा तहानलेलाच आहे.जिल्ह्याच्या शहरी भागातील नागरिक आजही आपली तहान टँकरच्या पाण्यावर भागवत असतात.लघुपाटबंधारे विभागाने जिल्ह्यात गेल्या सहा दशकात प्रत्येक तालुक्यात लहान धरणे बांधली असती,तर लोकांना पिण्याचे तर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकले असते.
जिल्हा दरवर्षी पाणीटंचाईमध्ये होरपळत असताना गुजरात सरकारने दमणगंगा – पिंजाळ नदी जोडप्रकल्प कार्यान्वित करून पिंजाळ नदीचे ६३ टीएमसी पाणी साबरमती नदीकडे वळवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.याच प्रकल्पातून मुंबई शहराला २० टीएमसी पाणी देण्याचे गाजर या गुजरात सरकारने दाखवले आहे.या सर्व घडामोडीत केंद्र सरकार गुजरात राज्याला झुकते माप देत असून दुसरीकडे या योजनेला आपल्या सरकारने मान्यता द्यावी,यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे.मात्र आपले नेते याविरोधात तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत.केंद्र सरकारच्या या दबावतंत्राला स्थानिकांनी भीक घातली नाही.या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी आता न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी चालवली आहे.हे पाणी जर गुजरातकडे वळवण्यात आले तर वाडा व अन्य तालुक्यातील कृषी क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार आहे.पण आपले नेते,या ज्वलंत प्रश्नी मूग गिळून बसले आहेत.

