दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
पालकमंत्री असा असता कामा नये,
आपल्या पालकमंत्रीपदाचा वापर पक्षवाढी व शिंदे गटाला नामोहरम करणाऱ्या वनमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात पालघर जिल्ह्यात नाराजीचे सूर उमटत आहेत.जिल्ह्यात नूकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने जिल्हावासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.ग्रामीण भागातील लोक या अस्मानी संकटामुळे पार खचून गेले असताना पालकमंत्री मात्र तिरंगा यात्रेत मश्गुल असल्याचे पाहायला मिळाले.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती व स्थानिक भूमिपुत्राच्या राहत्या घरांचे अतोनात नुकसान झाले.या नैसर्गिक संकटात शंभरहून अधिक घरावरील पत्रे व शेड्स उडून गेले,जनावरांचे अनेक गोठे जमिनदोस्त झाले.या वावटळीत अनेक कुटुंबे बेघर झाली,सर्वत्र हाहाकार उडाला.पण या संकटसमयी पालकमंत्री गणेश नाईक मात्र या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात फिरकले नाहीत.एरवी उठसुठ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे,शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात ठाण मांडणाऱ्या पालकमंत्र्यांच्या विरोधात जिल्हावासीय संताप व्यक्त करत आहेत.काल तिरंगा रॅलीसाठी जिल्ह्यात आवर्जून हजेरी लावणाऱ्या पालकमंत्र्यांना शेतीच्या बांधावर जाऊन बाधित शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे,असे वाटू नये,हे पालकमंत्री कसा असू नये,याचे उत्तम उदाहरण असावे.पालकमंत्री जर असा निष्क्रिय असेल तर नोकरशाही देखील मुर्दाडपणे वागणारच…

