दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” नरकातला स्वर्ग ” ; सत्ताधाऱ्यांची झोप उडाली,
खा.संजय राऊत यांच्या ” नरकातला स्वर्ग,” पुस्तकाचे काल मुंबईत प्रकाशन झाले.त्यांच्या या पुस्तकातील लिखाणाने भल्याभल्यांची झोप उडवून दिली आहे.खा.राऊत यांनी आपल्या या पुस्तकात अनेक विलक्षण घडामोडीवर प्रकाश टाकला आहे.त्यामुळे भाजपच्या अंधभक्ताचा पोटशूळ उठला आहे.दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्यामध्ये समावेश आहे.फडणवीस यांनी तर ” बालवाङ्मय मी वाचत नाही,आणि सध्या तसं माझं वयही नाही,” अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.हे पुस्तक अद्याप बाजारात आलेले नाही,ते आल्यानंतर प्रचंड गदारोळ उठण्याची शक्यता आहे.
या पुस्तकात खा.राऊत यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,हे एका प्रकरणात बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले होते व या भेटीत त्यांनी आपल्याला वाचवावे,यासाठी बाळासाहेबांना साकडे घातले होते.बाळासाहेबांनी त्यावेळी मदत केल्यामुळे अमित शहा हे सहीसलामत सुटू शकले होते.तसेच शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील अशीच मदत केली होती.या दोन्ही प्रकरणाचा खा.राऊत यांनी घटनाक्रम आपल्या पुस्तकात मांडला आहे.साहजिकच हा घटनाक्रम भाजपवाल्याना अस्वस्थ करणारा आहे.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्या पुस्तकाचे वर्णन बालवाङ्मय असे केले.मात्र याच बालवाङ्मयाने भाजपच्या नेत्यांची आता झोप उडवली आहे.काल या पुस्तकाचे मुंबईत शानदार सोहोळ्यात प्रकाशन झाले.
या प्रकाशन सोहोळ्यात बोलताना शरद पवार यांनीही सत्ताधारी पक्षाला आपल्या भाषणात चांगल्याच कोपरखळ्या मारल्या.आपल्या भाषणात त्यांनी अनिल देशमुख व एकनाथ खडसे,या दोघांच्या बाबतीत सुडाचे राजकारण कसे करण्यात आले,यावर सविस्तर भाष्य केले.खा.राऊत यांच्या या पुस्तकामुळे गेल्या पाच वर्षातील अनेक अनिष्ट गोष्टी उजागर होण्याची शक्यता आहे.सत्तेमधील सरकारला प्रश्न विचारण्याचा आपला अधिकार व हक्क आहे,हे या पुस्तकाने अधोरेखित केले आहे.

