दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आदित्य ठाकरे यांनी ठोकला विजयी षटकार ; राज ठाकरे क्लीनबोल्ड,
गेल्या महिन्यात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये राज यांनी ” आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो,” असे जाहीर वक्तव्य केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर आपला राजकीय बाजार चांगलाच वधारला.राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व चर्चेला उधाण आले.उद्धव व राज,हे भाऊ लवकरच एकत्र येणार व राज्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे पाहायला मिळणार, असे अंदाज व्यक्त होऊ लागले.हे दोघे भाऊ परदेश दौऱ्यावरून परतले की या होऊ घातलेल्या युतीचा शुभारंभ होणार,अशी चर्चा महिनाभर सुरू होती.मात्र हे दोघे परत आल्यानंतर याविषयी फारशा हालचाली झाल्या नाहीत.अशा परिस्थितीमध्ये काल आदित्य ठाकरे यांनी माध्यमाशी बोलताना ” आमचा पक्ष हा सेटिंग करणारा पक्ष नाही,” असे स्पष्ट करत आपल्या काकाश्रीवर अप्रत्यक्षपणे टिकास्त्र सोडले.त्यामुळे आता राज ठाकरे यांना आपल्या वक्तव्याचा फेरविचार करावा लागणार आहे.आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यातून आपले वडील व काका यांचे एकत्र येणे,त्यांना पसंत नसल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे एकत्रिकरणाची ही प्रक्रिया पुढे सुरू राहील,अशी शक्यता फार कमी आहे.
मराठी भाषा व मराठी माणसाला कोणी वाली उरलाय की नाही ? अशी ओरड गेल्या काही वर्षांपासून आपल्या राज्यात सुरू झाली आहे.अशा परिस्थितीमध्ये भाजपचा अश्वमेघ घोडा राज्यात चौफेर उधळू लागला आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह अनेक छोट्या पक्ष रसातळाला गेले.
तसेच भाजपच्या सक्तीच्या हिंदी धोरणामुळे राज्याच्या राजकारणात वेगळे परिणाम होऊ लागले आहेत.अशावेळी गेली दोन दशके एकमेकांविरोधात गरळ ओकणाऱ्या दोन पक्षाच्या नेतृत्वाने अचानक एकमेकांना मिठ्या मारण्याचे राजकारण करण्याचे संकेत दिल्यामुळे मराठी माणूस हरखून गेला. राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांना साद घातल्यानंतर त्यांनी सुद्धा अटी-शर्तींच्या आडून महाराष्ट्राचे हित व भाजपचे कट-कारस्थानाचे राजकारण लक्षात घेऊन राज यांना प्रतिसाद दिला पण तीला अद्याप मूर्त स्वरूप येऊ शकले नाही.
उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासात दोन वर्षांपूर्वी फार मोठे संकट आले.भाजपने एकनाथ शिंदे यांना आपल्या गळाला लावून उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवून टाकले.
दरम्यान २०२३ मध्ये भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह,एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले,तर उद्धव गटाला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व मशाल हे चिन्ह मिळाले.मात्र भाजपची ही खेळी महाराष्ट्राच्या जनतेच्या पचनी पडली नाही.त्यानंतर झालेल्या
लोकसभा निवडणुकीत महायुतीला सरस कामगिरी करता आली नाही.मतदारांनी महाविकास आघाडीच्या पदरात भरभरून दान टाकले. मात्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला ते टिकवता आले नाही.या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा झटका बसला.या निवडणुकीत त्यांना जनतेनं साफ नाकारलं.ईव्हीएम मशीनच्या मतदानात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे ” होत्याचे नव्हते,” झाले.त्यामुळे आघाडीतील तीनही घटक पक्षांसमोर सध्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.राज ठाकरे यांनी घातलेली साद त्यादृष्टीने महत्त्वाची होती.मुंबई महापालिका हातची जाऊ नये, यासाठी हे दोन्ही बंधु मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात,असे वाटले होते.पण प्राप्त परिस्थिती लक्षात घेता ही प्रक्रिया पुढे सुरू राहील,असे वाटत नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेख गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून पार घसरला आहे.पक्ष स्थापनेपासून मराठीच्या झंझावातावर मनसेने मोठा विजय मिळवला होता.२००९ मधील निवडणुकीत मनसेने १३ जागांची कमाई केली होती.त्यानंतर तर २०१४ मध्ये त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानवे लागले होते.२०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत त्यांना साधं खातंही खोलता आलं नाही.
लोकसभेत महायुतीला त्यांनी बिनशर्त सहकार्य केलं.एकही जागा त्यांनी लढवली नाही. त्याबदल्यात महायुती, माहीममध्ये आपल्या मुलाला पाठिंबा देईल,असे राज यांनी गृहीत धरले होते.पण महायुतीने त्यांना ठेंगा दाखवला.त्या निवडणुकीत अमित ठाकरेंचा झालेला पराभव हा राज यांच्या जिव्हारी लागला.माहिम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे उमेदवार महेश सावंत यांनी शिंदे गट आणि मनसेला धक्का दिला.मराठी आणि महाराष्ट्र या मुद्याभोवती राजकारण तापवले तर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाला भविष्यात चांगले यश मिळू शकते,असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत.या निवडणुकीत महायुतीसोबत गेलो तर आपल्याला पुरेशा जागा मिळणार नाहीत, हे लक्षात घेवून राज ठाकरे यांनी ही खेळी खेळल्याची चर्चा होत आहे.
२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या.तर भाजपाने ८२ जागा जिंकल्या होत्या.या निवडणुकीतही मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती.नूकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतली.तसेच त्यांनी मुंबई व ठाणे शहरात पक्षाचे मजबूत जाळे विणले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं, ही मराठी माणसाची इच्छा असली तरी राज ठाकरे यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे त्यांची युती कितपत टिकेल,याविषयी साशंकताच आहे.सध्या मुंबईत इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी,सतत होणारे वाद,यामुळे मराठी माणूस नाराजच नाही तर संतापलेला आहे.त्यांना एक चांगल्या पर्यायाची प्रतिक्षा आहे.मनसेला आपला विस्तार करायचा आहे.पण आदित्य ठाकरे याचा आपल्या काकावर किंचितही विश्वास नाही.काल त्यांनी केलेले वक्तव्य,हे बरंच काही सांगून जाते.भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यानंतर पक्षाचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे जाणार आहे.त्यावेळी आपल्या मार्गात काकाश्रीचा अडथळा नको,असा आदित्य ठाकरे याचा प्रयत्न असावा. त्यामुळेच त्यांनी ” आमचा पक्ष हा सेटिंग करणारा पक्ष नाही,” असे वक्तव्य करून या प्रक्रियेत खो घातल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

