दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वसई-विरारमध्ये असे अनेक सीताराम गुप्ता दडून बसले आहेत,
वसई विरार भागातील कुविख्यात भुमाफिया सीताराम गुप्ता यांच्यासह दहा ते बारा जणाच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी काल दिवसभर छापे मारले.सुमारे सहा ते सात तास,ही छापेमारी सुरू होती.यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.या पदाधिकाऱ्यांनी आता ” मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याची,” कोल्हेकुई सुरू केली आहे.
सीताराम गुप्ता हा वसई विरार भागातील कुप्रसिद्ध भुमाफिया असून गेल्या तीन दशकात त्याने सरकारी,आदिवासी व शासकीय कामासाठी आरक्षित असलेल्या असंख्य जमिनी गिळंकृत केल्या व स्वतःचे आर्थिक साम्राज्य उभे केले.एका राजकीय पक्षात सक्रिय असल्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी त्याला वचकून असायचे.तो महानगरपालिकेचा माजी नगरसेवक होता.त्याने आपल्या या गोरखधंद्यात महानगरपालिकेचे अनेक अधिकारी,पोलीस व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी याना सामावून घेतले आहे.त्यामुळे गेले तीन दशके त्याचा धुमाकूळ अव्याहतपणे सुरू होता.नालासोपारा पूर्व भागात त्याने अनधिकृत बांधकामाचे साम्राज्यच उभे केले.आपल्या स्वतःच्या नावाने त्याने औद्योगिक वसाहत देखील उभी केली आहे.काही वर्षांपूर्वी त्याने नालासोपारा शहरात डंपिंग व मल:निसारण केंद्रासाठी आरक्षित असलेली जमीन,खोटी कागदपत्रे बनवून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या चाळमाफियाना विकल्या.त्यांनी या जमिनीवर ४१ अनधिकृत इमारती बांधल्या.या जमिनीचा मूळ मालक असलेल्या व्यक्तीने या प्रकरणी महानगरपालिकेकडे सतत दाद मागितली,पत्रव्यवहार केला.पण या महाभागाने महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मॅनेज करून कोणतीही कारवाई होऊ दिली नाही.त्यामुळे मूळ मालकाने अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.चार महिन्यांपूर्वी या प्रकरणी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने या ४१ इमारती जमिनदोस्त करण्याचे आदेश दिले.त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी ताळ्यावर आले व त्या ४१ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या.या सर्व कारवाईमध्ये सुमारे चारशे कुटुंबाचे संसार रस्त्यावर आले.त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तक्रारीनंतर सक्तवसुली संचलनालयाने काल कारवाईचा बडगा उचलला.काल पडलेल्या धाडीमध्ये या सीताराम गुप्ता याच्या घरातून महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.त्यामुळे अनेकजण आता ईडीच्या रडारवर आले आहेत.ईडीच्या कारवाईचे सर्व थरातून स्वागत करण्यात येत आहे.पण या सीताराम गुप्ता सारखे अनेक सीताराम गुप्ता या क्षेत्रात दडून बसले आहेत,त्यांना हुडकून काढून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी करण्यात येत आहे.गृहनिर्माण संस्थासाठी असलेले,गार्डन प्लॉट कब्जा करणे,इमारतीवर अनधिकृत मजले बांधणे, सरकारी जमिनी हडप करणे, जमिनी गृहनिर्माण संस्थांच्या नांवे न करणे,तसेच मनपाचे बोगस सीसी व ना हरकत दाखले तयार करणे,अशी गैरकृत्ये करणारे अनेक समाजकंटक या वसई/विरार उपप्रदेशात गेली अनेक वर्षे धुमाकूळ घालत आहेत. त्यांच्यासह मनपा अधिकारी, प्रभाग समितीचे प्रभारी सहा. आयुक्त व पोलिसांवरही धाडी पडायला हव्यात,तरच या अशा गोरखधंद्याला पायबंद बसू शकतो.

