दीपक मोहिते,
अवकाळी पावसाचा पालघर व नाशिक जिल्ह्याला पुन्हा दणका,
काल जव्हार,नाशिक,त्र्यंबकेश्वर या भागात जोरदार पाऊस पडला.सांयकाळी चारच्या सुमारास सुरू झालेल्या या धुवांधार पावसाने नागरिकांची पार दाणादाण उडवून दिली.अनेक भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर चांगलाच परिणाम जाणवला.सुमारे चार तास झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन पार विस्कळीत झाले होते.
राज्यात पडत असलेल्या अवकाळी पावसाने अनेक रब्बीची पिके धोक्यात आली आहेत.शेतकरीवर्ग चिंतेत सापडला असताना काल पुन्हा अवकाळी पावसाने पालघर व नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले.सलग चार तास पडलेल्या या पावसाने या दोन्ही जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले.नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.तर गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने पालघर जिल्ह्यातील सुमारे दीड ते दोन हजार घराची पडझड झाली तर अनेक मच्छिमार बोटी क्षतीग्रस्त झाल्या.काल आलेल्या या नैसर्गिक संकटात किती नुकसान झाले,याविषयीची आकडेवारी अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.पण यामध्ये वीटभट्टीचे मात्र प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत,अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेकडून करण्यात येत आहे.दरम्यान आजही या दोन जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या दोन्ही जिल्ह्यात दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनला सुरुवात होत असते.परंतु यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन वेळेआधी झाल्यामुळे राज्यातही पावसाचे आगमन वेळेआधी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

