दीपक मोहिते,
बाधित शेतकरी,मच्छीमार व ग्रामस्थांना तातडीच्या मदतीची गरज,
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी,मच्छीमार व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे भयावह स्वरूप लक्षात घेता सरकारने तुटपुंजी नुकसानभरपाई न देता जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे.अनेक ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडाले,मच्छीमार बोटी क्षतीग्रस्त झाल्या व अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले,त्यामुळे,या घरांची तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे.तसेच या नैसर्गिक आपत्तीमध्ये शंभरहून अधिक मच्छीमार बोटीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.या मच्छीमाराना आपल्या बोटीची दुरुस्ती करण्यासाठी त्वरित आर्थिक सहाय्य मिळायला हवे.अन्यथा अनेक मच्छीमार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग भितीच्या सावटाखाली आला आहे.वाडा,मोखाडा,विक्रमगड,जव्हार व तलासरी तालुक्यात उन्हाळी पिकाची मोठ्याप्रमाणात लागवड करण्यात येत असते.अवेळी आलेल्या या अवकाळी पावसाने रब्बी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले.जिल्हाप्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.पण बाधित शेतकरी,मच्छीमार व ग्रामस्थ यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.अवकाळी पावसासोबत वादळी वारे वाहिल्यामुळे सुमारे अडीच हजार घराचे पत्रे उडून गेले आहेत.त्यामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.जिल्हा प्रशासनाने त्यांच्या घरांची डागडुजी व दुरुस्ती त्वरेने करावी व अर्थसहाय्य उपलब्ध करावे,अशी मागणी करण्यात येत आहे.

