दीपक मोहिते,
” चुकीचा पायंडा,”
भारताने युक्रेनसारखी हिम्मत दाखवायला हवी होती,
अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत – पाक युद्धात शस्त्रसंधी घडून आली.युद्ध होणे व ते लांबत जाणे,कधीही हानिकारकच असते.त्यामध्ये मानवी संहार,युद्धात उतरलेल्या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था रसातळाला जाणे,सार्वजनिक मालमत्तेची होणारी अपरिमित हानी,व्यापार व औद्योगिक वाढीला खीळ बसणे,अशा प्रकारामुळे युद्ध लांबत जाणे,हे कोणत्याही देशाला परवडणारे नसते.रशिया – युक्रेन,इस्त्रायल – पॅलेस्टाईन युद्धात आपण हे सारे अनुभवत आहोत.त्यामुळे गेल्या आठवड्यात सुरू झालेले भारत – पाक युद्ध त्वरित थांबावे,यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीय देश आग्रही होते.पण पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आतताईपणामुळे हे युद्ध आठवडाभर लांबले.
भारताने थेट लाहोर,कराची व पाकव्याप्त काश्मीर पर्यंत मुसंडी मारल्यानंतर पाकची भंबेरी उडाली व त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे धाव घेत,मध्यस्थी करण्याची विनंती केली.त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी ट्रम्प यांच्या आदेशानुसार शस्त्रसंधी घडवून आणली.ही शस्त्रसंधी दोन्ही देशांच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांनी फोनवरून या शस्त्रसंधीला मान्यता दिली.अशाप्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.आजवर झालेल्या युद्धात अशाप्रकारची शस्त्रसंधी कधीच अनुभवायला मिळाली नाही.भारत व पाक यामध्ये शस्त्रसंधी झाल्याचे या देशांनी नव्हेतर मध्यस्थ म्हणून हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकेने स्वतः जातीने प्रेस रिलीज करून जाहीर केले.वास्तविक भारत व पाक यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त प्रेस रिलीज जाहीर करणे आवश्यक होते.अमेरिकेने श्रेय उपटण्याच्या इर्षेने हा उपद्व्याप केला.दोन देशाच्या युद्धात त्रयस्थ देश शस्त्रसंधी झाल्याची एकतर्फी घोषणा करतो,हे मुळात चुकीचे आहे.युक्रेन – रशिया या दोघांमध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेंलेंस्की यांच्यावर युद्धबंदी करण्यासाठी प्रचंड दबाव टाकला होता,पण झेलेन्स्की यांनी त्याला धूप घातली नाही.यावेळी ट्रम्प व झेलेन्स्की यांच्यात चर्चेच्या वेळी झालेली हमरी तुमरी उभ्या जगाने पाहिली.या बैठकीनंतर झेलेन्स्की हे रागारागात ट्रम्प यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले होते.जे युक्रेन करू शकला,ते आपण का करू शकलो नाही,या प्रश्नाचे उत्तर आपल्या सरकारने भारतीय जनतेला दिले पाहिजे.

