दिपक मोहिते,
” टीआरपीचा धिंगाणा,”
भारतीय जनतेने गेल्या आठ दिवसात वृत्तवाहीन्याचा उन्माद अनुभवला….
गेल्या आठ दिवसात देशातील वृत्तवाहिन्यांना भारत व पाक या देशात झालेल्या युद्धामुळे बऱ्यापैकी खाद्य मिळाले होते.देशभरातील तमाम
वृत्तवाहिन्यांनी सलग आठ दिवस आपल्या छोट्या पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला.दिवसरात्र केवळ युद्धाच्या घडामोडीनी लोकांच्या सहनशीलतेचा जणू अंतच पाहिला.

टीआरपीच्या या जीवघेण्या स्पर्धेत जवळपास सर्वच वृत्तवाहिन्या आपले भान हरवून बसले होते.एकच बातमी,दर्शकांनी किती वेळा पहायची ? यावर केंद्र सरकारने आता नियंत्रण आणण्याची गरज आहे.अनेक वृत्तवाहिन्यांनी एकच बातमी दोनशे हुन अधिक वेळा दाखवण्याची जणू स्पर्धाच लावली होती.यावेळी अनेक वृत्तवाहिन्यांनी माजी लष्करी अधिकाऱ्यांना लष्कराचे विशेष तज्ञ म्हणून पाचारण केले होते.त्यातून नक्की काय निष्पन्न झाले,ते त्या परमेश्वरालाच ठाऊक.पण या सगळ्यानी वृत्तवाहिन्या दिवसभर चालू राहतील,इतक्या खाद्याचा साठा केला होता,हे पाहायला मिळाले.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्या मीडियाची पत चांगलीच घसरल्याचे जाणवले.वृत्तवाहिन्याचा हा एकप्रकारचा उन्माद होता,असे म्हंटल्यास ते वावगे ठरू नये.पाकिस्तान घाबरला,त्यांचा लष्कर प्रमुख तुर्कस्तानात पळाला,त्यांचे पंतप्रधान नाहीसे झाले,त्यांच्या सैनिकांनी लढण्यास नकार दिला.अशाप्रकारच्या बातम्या वृत्तवाहिन्यांनी सर्रास चालवल्या.त्यामुळे आपल्या मीडियाचे जे ” गोदी मीडिया,” असे बारसं झालंय,ते योग्यच म्हणावे लागेल.वास्तविक युद्धाच्या काळात मिडियाने जबाबदारीने वागायला हवे,पण गेल्या दहा ते अकरा वर्षात आपल्या मीडियाची विश्वासार्हता पार रसातळाला गेली आहे.बातम्यांचे रिपीटीशन किती वेळा व्हावे,यावर सरकारने आता मर्यादा आणायला हव्या.युद्धाच्या काळात युद्धभूमीवर प्रत्यक्ष जे काही घडतं,त्याचा ” आंखो देखा हाल,” लोकांपर्यंत पोहोचवणे,हे मीडियाचे काम असते.१९९९ साली कारगिल युद्धाच्या वेळी आंतरराष्ट्रीय किर्तीची पत्रकार बरखा दत्त यांनी कारगिल येथे बॉम्बवर्षाव होताना लाईव्ह कव्हरेज केले होते.त्यावेळी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाककडून होणाऱ्या तुफान गोळीबारामुळे त्यांना बंकरमधून शूट करण्याचे आदेश दिले होते.याला आपण पत्रकारिता म्हणू शकतो.पण आता परिस्थिती बदलत चालली आहे.आपले सरकारच आता मीडियाला गोदीत बसवू लागले आहे,त्यामुळे चांगली पत्रकारिता हल्लीच्या मिडियाकडून अपेक्षित नाही.

