दिपक मोहिते,
रयतेची निव्वळ फसवणूक,
देवाभाऊ,” अजब तुझे सरकार,”
राज्य सरकारने १०० दिवस पूर्ण झाल्या संदर्भात प्रत्येक विभागाचा लेखाजोगा मांडला आहे.अनेक विभागाने पैकीच्या पैकी गुण मिळवत बाजी मारली आहे.आपण या लेखाजोगात पहिल्या पाच क्रमांकावर विराजमान झालेल्या पाच विभागावर बोलणार आहोत.हे पाच विभाग कोणते आहेत,याची सर्वप्रथम माहिती घेऊ या..
महिला व बालकल्याण,सार्वजनिक बांधकाम,कृषी,परिवहन व मत्स्य व बंदरे,असे ते पाच विभाग आहेत.या पाच विभागाची गेल्या १०० दिवसात कामगिरी कशी होती ? यावर एक प्रकाशझोत….
१ ) महिला व बालकल्याण – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवत तत्कालीन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली.( प्रत्येक महिलेला दरमहा १५००/- रु. ) त्यामुळे निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले.त्यानंतर सरकारने १५००/- ऐवजी ६००/-ची वाढ करून २१००/- रु.देण्याचे जाहीर केले.पण प्रत्यक्षात ही वाढीव योजना अंमलात आली नाही.कारण सरकारी तिजोरीत निर्माण झालेला खडखडाट.१५००/- रु.देताना सरकारची दमछाक होत होती,त्यामुळे आणखी आर्थिक बोजा घेणे,अधिक धोकादायक ठरणारे होते.दरम्यान दरमहा देण्यात येणारे १५००/- रु.चे हप्ते थकायला सुरुवात झाली.हे पैसे देण्यासाठी सरकारने अनेक विभागाचा निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यास सुरुवात केली.सरकारच्या या लुच्चेगिरीमुळे इतर विभागाचे मंत्री नाराज झाले.विकासकामांना निधी मिळत नसल्याचे पाहून मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होऊ लागली.त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यावर अनेक अटी व शर्ती लादत लाभार्थ्यांच्या संख्येत कपातीचे हत्यार उपसण्यात आले.पहिल्याच फटक्यात सुमारे ९ लाख बहिणीवर कुऱ्हाड कोसळली.वाढीव ६००/- रु.मिळणे दूरच राहिले,मिळत असलेले १५००/- रु.गमावण्याची पाळी या लाडक्या बहिणीवर आली.निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणी निवडणुकीनंतर ” नकोश्या,” झाल्या.अशा या महिला व बालविकास विभागाला १०० % गुण मिळाले व हा विभाग पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला.
२ ) सार्वजनिक बांधकाम विभाग –
हा विभाग गृह व महसूल विभागासारखा मलईदार विभाग म्हणून ओळखला जातो.या विभागाच्या मंत्र्यांची ” पांचो उंगली घीमे,” अशी खमंग चर्चा मंत्रालयात सतत ऐकायला मिळते.हे १०० % खरे आहे.रस्ते,उड्डाणपूल बांधणीचा कार्यक्रम या विभागातर्फे राबवण्यात येत असतो.दरवर्षी
अर्थसंकल्पात या विभागाला प्रचंड आर्थिक निधी मिळत असतो.या निधीच्या खर्चातून मिळणारी टक्केवारी ही हजारो कोटी रु.च्या घरात असते.रस्ते बांधले गेले नाहीत,तरी ठेकेदारांची
बिले निघत असतात.या विभागातर्फे बांधण्यात येणाऱ्या समृद्धी मार्गाने विभागाच्या काही मंत्र्यांच्या जीवनात चांगली आर्थिक समृद्धी आणली.असा हा विभाग क्रमांक दोन वर आहे.
३ ) कृषी – हा विभाग गेली अनेक वर्षे बदनामीच्या सावटाखाली वावरत आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या,पीकविमा योजना,बोगस बी-बियाणे/ खते अशा गैरप्रकारामुळे पुरता बदनाम झाला आहे.विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कारनामे तर जगजाहीरच आहेत.त्यांच्या तोंडाळपणामुळे त्यांचा पक्ष अनेकदा अडचणीत आला. आज या कृषी विभागाचे विमान चांगलेच भरकटले आहे.अशा या कृषी विभागाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
४ ) परिवहन – हा विभाग गेली अनेक वर्षे अडखळत कसाबसा तग धरून आहे.वेळेवर एसटी कामगारांना पगार नाही,रस्त्यात बंद पडणाऱ्या एसट्या,साहित्याची वानवा,इ.कारणामुळे एसटी सेवा धायकुतीला आली आहे.अशा दुष्टचक्रात सापडलेल्या विभागाची धुरा बिल्डर असलेल्या प्रताप सरनाईक यांच्यावर सोपवण्यात आली व त्यांची वक्रदृष्टी एसटी महामंडळाच्या हजारो कोटी रु.किमतीच्या जमिनीवर पडली व आता त्या लवकरच विक्रीसाठी बाजारात येणार आहेत.यातून मिळणारा पैसा एसटी कामगारांचे भले व नवीन एसटी खरेदी करण्यासाठी होणार आहे,असे सांगण्यात येत आहे.अशा या विभागाने चौथा क्रमांक मिळवला आहे.
५ ) मत्स्यव्यवसाय व बंदरे – या विभागाच्या मंत्र्यांकडे हा विभाग का देण्यात आला हे कळायला मार्ग नाही,कारण आपल्या विभागाच्या
कामकाजापेक्षा हे मंत्रीमहोदय,दोन समाजात तेढ निर्माण करणे,हलाल मटण,मशिदीत घुसून मारणे,असे विषय हाताळण्यात धन्यता मानत असतात.त्यांना खरं तर ” आगलावे,” नावाचा नवा विभाग निर्माण करून ते सोपवायला हवे होते.पण त्यांना हे महत्वाचे खाते सोपवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेमके काय साध्य कळायला मार्ग नाही.अशा या मंत्र्यांच्या विभागाला पाचवा क्रमांक मिळाला आहे.
वरील सर्व विभागांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.ही जी क्रमवारी लावण्यात आली आहे,त्यामागे निकष काय लावण्यात आले,याचा शोध घेण्याच्या फंदात कोणी पडता कामा नये,कारण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

