दीपक मोहिते,
भाजपवाल्याना राष्ट्रहितापेक्षा पक्षीय हित मोठे,
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या मिडियाने दोन देशात आता युद्धाला तोंड फुटणार,मोदी प्रत्येक दहशतवाद्याला हुडकून ठोकणार,पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे,अशा बातम्या पेरल्या.पण त्याचवेळी पाकिस्तानची आर्मी आपल्या टेहळणी चौक्यावर बेछूट गोळीबार करत होती.
आपणही सारे लवकरच युद्ध सुरु होईल,अशी अपेक्षा बाळगून होतो.या घटनेला अकरा दिवस उलटल्यानंतरही आपल्या तपास यंत्रणाना अद्याप त्या पाच नराधमांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही.हे आपल्या तपास यंत्रणा तसेच लष्कराचे अपयशच म्हणावे लागेल.पूर्वी दोन देशात युद्ध सुरू करणे,सहजशक्य होत असे.आता तशी स्थिती नाही.कारण काही किरकोळ अपवाद वगळता प्रत्येक देश आता अन्वस्त्रधारी देश बनला आहे.त्यामुळे युद्ध होणे,आजच्या घडीला कोणालाही परवडणारे नाही.पाकिस्तानला बेचिराख करण्याची जी काही स्वप्ने मूठभर लोकांना पडत आहेत, ते लोक मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत.अनेकांना आजही युद्ध म्हणजे भातुकलीचा खेळ वाटतो.युध्द हे एकाही देशाला परवडणारे नाही.आजच्या घडीला रशिया व इस्त्रायल हे दोन्ही देश युक्रेन व पॅलेस्टाईन/लॅबेनॉन या दोन देशांना उध्वस्त करू शकले. कारण त्यांच्या शत्रू देशाकडे अणूबॉम्ब नाहीत.पाकिस्तानच्या बाबतीत तशी स्थिती नाही. भारत व पाकिस्तान या दोघांकडे प्रत्येकी १७० अणुबॉम्ब आहेत.त्यामुळे युद्ध छेडण्यापूर्वी दोन्ही देशांना ही स्थिती लक्षात घ्यावी लागते. जपानच्या हिरोशीमा व नागासकी या दोन शहरावर जेंव्हा अमेरिकेने अणूबॉम्ब टाकले,तेव्हा या दोन शहरात सुमारे साडेचार लाख लोक मृत्यूमुखी पडले,तर सात ते आठ लाख लोक गंभीर जख्मी झाले.आजही त्या जखमाचे वण जपानी लोकांच्या अंगावर पाहायला मिळतात.
त्यामुळे आर्थिक कोंडी करणे, संयुक्त राष्ट्र समितीमध्ये पाकिस्तानला अडचणीत आणणे,त्यांच्या देशातील फुटीरतावाद्याना रसद पुरवणे,अशा स्तरावर कामे होणे गरजेचे आहे.आपल्या तपास यंत्रणा,बलूचिस्तान व पाकिस्तानचा परंपरागत शत्रू असलेल्या अफगाणिस्तानला कायम मदत करत आले आहेत.भाजपवाले या अशा दुर्धर संकटातही पक्षीय स्वार्थाला हवा देऊ पाहत आहेत,लोकांनी त्यांचे हे डावपेच ओळखले पाहिजे. त्यांना राष्ट्रहीतापेक्षा पक्षाचे हित महत्वाचे वाटते,ही खऱ्या अर्थाने दुर्देवी बाब आहे.

