दीपक मोहिते,
मिडिया/सोशल मीडिया, ” शाप की वरदान ?, ”
चार महिन्यापूर्वी निवडणुकीची धामधूम आता थांबली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील,हे सांगणे आता ब्रम्हदेवालाही शक्य नाही.चार महिन्यापूर्वी सोशल मिडियावर धडाडणाऱ्या तोफा आता पुढील निवडणुकापर्यंत आग ओकणार नाहीत.एकमेकांच्या उखाळ्या- पाखाळ्या ऐकण्यात महिना कधी निघून गेला,ते कळलेही नाही.
या निवडणुकीत सोशल मीडियावरील करामतीमुळे तर मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले.निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडिया,हे आता सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे आणि लोकानी ते स्विकारलेही आहे.पूर्वी पक्षांची मुख्यालये,ही निवडणुक प्रक्रियेतील महत्वाची केंद्रे म्हणून ओळखण्यात येत असत,आता त्याची जागा सोशल मीडियाच्या
वॉररुमने घेतली आहे.या वॉररूम्स आता अत्यंत प्रभावी ठरू लागल्या आहेत.
” होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते,” कसं होत,हे या सोशल मीडियाने या निवडणुकीत करून दाखवले. बदनामी,चिखलफेक,खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे,यास या माध्यमाने राजाश्रय मिळवून दिला.यापूर्वी आपण सकाळी चहाचे घोट घेत दैनिकांची पाने चाळत असू,आता रामप्रहरी फेसबुक,व्हाटसअप,ट्विटर ओपन करतो,आणि त्याच सुमारास नेट बंद,नेटवर्क नसणे किंवा धिमीगती असल्यास,आपला जीव कासावीस होत असतो व आपण मोबाईल ऑपरेटर कंपन्यांना लाखोली वाहतो.आता हे सारे नित्याचेच झाले आहे,कारण आपण सोशल मीडियाच्या इतके आहारी गेलो आहोत कि, एकवेळ जेवण उशिराने करू, पण या सर्व सोशल मिडीया साईट्स वेळेवर पहायाला मिळायला हव्यात,असा आपला अट्टाहास असतो.किंबहुना आपली तशी मानसिकताच आता तयार झाली आहे.दुर्देवाने या वावटळीत समाजातील सर्व घटक सामिल झाले आहेत.त्यामध्ये लहान मुले तरुण,तरुणी,महिला,वयोवृद्ध व्यक्ती,या सर्वांचा समावेश आहे.कालांतराने हे माध्यम मानवाला कुठे नेऊन ठेवणार आहे ? याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.सरकारने अशा साईटवरून बदनामी,तसेच गुन्हे करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी सायबरसेलची निर्मिती केली आहे.परंतु दुर्देवाने हा सेल प्रभावी ठरू शकला नाही.त्यामुळे येणारा काळ अत्यंत खडतर असा आहे.
सन २०१४ साली भाजपने काँग्रेसची बदनामी करण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर वापर केला.त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीत जबर फटका बसला व भाजप सत्तेत विराजमान झाले.आता त्याचे बुमरँग होऊन भाजपवर उलटले आहे.स्वातंत्र्योत्तर काळात कोणत्याही पंतप्रधानांची इतकी बदनामी झाली नसेल,तेवढी ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झाली व ती वाजतागायत सुरूच आहे. ” जे पेरले ते उगवले,”असे याचे वर्णन करता येईल,पण भाजपने केले काय ? किंवा इतरांनी केले काय ? हा प्रकारच मुळात गैर असून त्यावर निर्बंध आले पाहिजेत.आज सोशल मीडियावरून फेकू,पप्पू,हे जे काही चालले आहे,त्यामुळे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचा चेहरा विद्रुप होत चालला आहे.दुर्देवाने यामध्ये आपली सुरक्षा व्यवस्थाही अधूनमधून अडचणीत येत असते.कोणत्याही साधनांचा सकारात्मक वापर व्हायला हवा,परंतु त्याचा आता सर्वानाच विसर पडत चालला आहे,व ते भविष्यात अत्यंत धोकादायक ठरणार आहे.
गेल्या अकरा वर्षाच्या काळात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया यांचे नव्याने बारसे झाले आहे.आता या दोन्ही माध्यमाचे ” गोदी मिडिया,” असे गोंडस नामकरण झाले आहे.राजकीय नेते व पोलिसांची तळी उचलणारी नवी पिढी,आता या क्षेत्रात नव्याने सक्रिय झाली आहे. काही दिवसापूर्वी आमच्या काही महाभाग पत्रकारांनी ( यांना पत्रकार म्हणण्या ऐवजी भाट म्हणणे योग्य ठरेल ) एका पोलीस अधिकाऱ्याच्या वाढदिवशी थेट पोलीस ठाण्यात जाऊन त्याचा वाढदिवस साजरा केला.( त्याच्या केबिन सजावट करत अगदी धूमधडाक्यात केक कापला ) कदाचित त्यादिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्वर्गात धायमोकलून रडले असावेत.या अशा परीस्थितीमुळे ” मिडिया शाप की वरदान,” या विषयावर आता सर्वत्र खमंग चर्चा सुरू झाली आहे.

