सुरेश वैद्य,पालघर,
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उदघाटन,
राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी,याकरिता जिल्हास्तरावर ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष,” स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.त्यानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी खा.डॉ.हेमंत सवरा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते.या निधीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२ फेब्रु.२०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.त्यानंतर २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत जिल्हास्तरीय कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले.
पूर्वी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना सहाय्यता निधीसाठी मंत्रालयात वारंवार जावे लागत होते.या त्रासातून मुक्तता मिळावी,यासाठी जिल्हा स्तरावरच सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला असून, त्यामुळे अर्जदारांना स्थानिक पातळीवरच मार्गदर्शन, कागदपत्र पडताळणी व पाठपुरावा करता येणार आहे.
राज्यस्तरीय कक्ष प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

