दीपक मोहिते,
” कामगार दिन विशेष,”
“१ मे जागतिक कामगार दिन ; कामगार जगला पाहिजे,”
हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, यंदाही तो उत्साह कायम असला तरी सध्याच्या परिस्थितीत कामगारवर्ग भितीच्या सावटाखाली आहे. केंद्र व राज्यसरकार हे दोघेही भांडवलधारी व्यवस्थेकडे झुकू लागले आहेत.कामगार व शेतकरी हे एकेकाळी श्रमिक वर्गाचे प्रतिनिधित्व करत असत.पण आता काळ बदलत चालला आहे. उद्योग जगताचा डोलारा ज्या कामगार सामर्थ्यावर उभा असायचा, तसा तो उभा असल्याचे पाहायला मिळत नाही.
आपली अंगमेहनत व बुद्धिक्षमता विकून महिन्याकाठी वेतन घेणाऱ्या घटकाचा कामगारवर्गात समावेश होतो.भांडवलदारांच्या उद्योगात राबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या मजुरांचा ” कामगार,” अशी व्याख्या करण्यात आली होती.स्वातंत्र्यपूर्व व उत्तर काळात भांडवलशाहीच्या उदयाला सुरुवात झाली.मात्र आता आधुनिकतेच्या लाटेत हा वर्ग हळूहळू नाहीसा होऊ लागला आहे.कामगारांची स्थिती व गरज,अशा दोन ज्वलंत विषयावर विचार मंथन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.यांत्रिकीकरणाला प्रचंड वेग आला असून या प्रक्रियेत या उपेक्षित घटकाचा पाय खोलात शिरू लागला आहे.विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कामगारवर्गाला खूप महत्व होते.पण नंतरच्या काळात भांडवलदारानी या वर्गाचे शोषण करण्यास सुरुवात केली,त्यामुळे हा कामगार आपला हक्काचा ” कामगार दिन,” साजरा करू शकेल,अशा स्थितीत आता नाही.देशाच्या अर्थव्यवस्थेत भांडवलदारासोबत कामगारांचे भरीव योगदान आहे,पण भांडवलदार व आपल्या मायबाप सरकारला ते मान्य नाही.त्यामुळे या घटकांचे गेल्या ७५ वर्षात प्रचंड प्रमाणात शोषण झाले.भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार व कामगार,असा वर्गकलह अटळ असतो,पण तो सरकारला मान्य नाही.सरकार हे कायम भांडवलदारांच्या पाठीशी राहण्यात धन्यता मांडत आले.कामगार व भांडवलदार या दोघांचे हितसंबंध एकमेकांच्या विरोधी आहेत.त्यामुळे कामगार संघटनेचे भांडवलदारांवर अंकुश ठेवण्यासाठी व आपल्या मागण्याविषयी दक्ष राहण्याची गरज आहे,असा कामगार नेते कार्ल मार्क्स यांचा सिद्धांत सांगतो.
पण दुर्देवाने कामगार संघटना कमकुवत करण्याच्या दृष्टीने आपले मायबाप सरकार देखील मालकवर्गाला सर्वतोपरी मदत करू लागले आहे.एकीकडे यांत्रिकीकरण तर दुसरीकडे कामगार संघटनांचे खच्चीकरण,यामुळे कामगारांचे प्रचंड प्रमाणात शोषण होऊ लागले आहे.त्याचा परिणाम येणाऱ्या काळात देशाच्या आर्थिक विकासावर होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकार देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन करण्याची स्वप्ने पाहत आहे,पण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ” कामगार,” हा घटक देशोधडीला लावून हे कदापी शक्य होणार नाही.

