दीपक मोहिते,
” राज्य निर्मिती विशेष,
“महाराष्ट्र देशा,कणखर देशा,”
आज राज्याचा ६६ वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने राज्यात दिवसभर शासकीय व बिगरशासकीय कार्यक्रमाची अक्षरशः रेलचेल असणार.
१ मे १९६० रोजी आपल्या राज्याची निर्मिती झाली,त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली,हजारो लोकांचे संसार,या आंदोलनात होरपळले,याची कल्पना सध्याच्या पिढीला नाही.महाराष्ट्रद्वेष्ट्या मूठभर काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान किती अत्याचार केले,त्याची गोळाबेरीज करणेही शक्य नाही.आज राज्य देशात प्रगतीशील राज्य असले तरी,हल्लीचे राज्यकर्ते लचके तोडू लागले आहेत.देशाच्या एकूण महसुलापैकी आपले महाराष्ट्र राज्य ३३ % कर देते.मुंबई ही गेल्या काही वर्षांपासून देशाची आर्थिक राजधानी असून तिचे हे आर्थिक वैभव आता गटांगळ्या खाऊ लागले आहे.राज्याचे आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या खच्चीकरण व्हावे,यासाठी राजकीय शक्ती सक्रिय झाल्या आहेत.उद्योगधंदे स्थलांतरित करण्याचे जोमाने प्रयत्न होत आहेत.मात्र ज्या मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले,त्यांचे बलिदान मराठी माणूस वाया जाऊ देणार नाही,हेही तितकेच खरे आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास हा मराठी माणसाच्या लढ्याने ओतप्रोत भरलेला आहे.१९५० ते १९६० दरम्यान राज्य निर्मितीसाठी जी व्यापक आंदोलने झाली,ती राज्य निर्मितीचा मंगल कलश आणल्यानंतरच थंडावली.त्यासाठी १०५ जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती,तर हजारो लोकांवर खटले दाखल झाले होते.या लढ्याचे नेतृत्व सेनापती बापट,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहीर अमर शेख,प्रबोधनकार ठाकरे,एस.एम.जोशी,
उद्धवराव पाटील,आचार्य अत्रे,कामगारनेते श्रीपाद डांगे,यांनी केले.त्याकाळी आचार्य अत्र्यांचा मराठा त्याकाळी अक्षरशः आग ओकत होता.आपल्या विषयी उद्या मराठामध्ये काय छापून येईल ? अशा भीतीमुळे काँग्रेस नेत्यांना रात्रीची झोप लागत नसे.शाहीर अमर शेख,शाहीर अण्णाभाऊ साठे व शाहीर गव्हाणकर यांनी मराठी अस्मिता धगधगत ठेवण्यासाठी आपला कलाविष्कार पणाला लावला होता.एकीकडे आंदोलनाची धार वाढत असताना दुसरीकडे काँग्रेस नेते मोरारजी देसाई व स.का.पाटील,हे प्रक्षोभक भाषणे करत होते.फेब्रु.१९५६ मध्ये मुंबई,केंद्रशासित केल्याची घोषणा करण्यात आली आणि आगडोंब उसळला,सर्वत्र संतापाची लाट उसळली,मोर्चे,सत्याग्रह हरताळ,बंद,संप,यास उत आला.देशाचे तत्कालीन अर्थमंत्री सी.डी.देशमुख यांनी महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला.त्यांच्या राजीनाम्यामुळे चळवळीला आणखी बळ मिळाले व आंदोलनाची व्याप्ती अधिक विस्तारीत होत गेली.” मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,” अशी आरोळी आसमंतात घुमली.काँग्रेस नेत्यांना सुरक्षा रक्षकाशिवाय फिरणे कठीण झाले.परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच काँग्रेस नेते स.का.पाटील व मोरारजी देसाई यांनी आगीत तेल ओतणारी विधाने केली.मोरारजी देसाई यांनी ” काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई कदापी महाराष्ट्राला मिळणार नाही,” तर स.का.पाटील म्हणाले,” कितीही आंदोलने करा,पण ५ हजार वर्षे उलटली तरी मुंबई,महाराष्ट्राला मिळू शकणार नाही,” त्यांच्या या विधानामुळे आंदोलन अधिक तीव्र होऊन ते फोफावत गेले व लढ्याला चांगलीच धार आली.त्यामुळे केंद्र सरकार हतबल झाले,लोकांचा हा प्रक्षोभ निवळावा,यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आणि १ मे १९६० रोजी राज्याची निर्मिती झाली.आज आपण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.आपण प्राणाची बाजी लावून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करू शकलो,पण बेळगाव-कारवार हा प्रदेश आपण महाराष्ट्रात समाविष्ट करू शकलो नाही,ही खंत मात्र आजही कायम आहे.
गेल्या ६६ वर्षात या पुरोगामी राज्याने देशातील विविध जाती-धर्मातील लोकांना रोजगार दिला,मायेची उब दिली,बहुभाषिक उद्योगपतींना आर्थिक भरभराट दिली,आता त्या राज्याची दिल्ली दरबारी सतत
उपेक्षा होत आहे,ही सल उराशी बाळगत,चला हा दिवस,आपण उत्साहात साजरा करू या..
जय महाराष्ट्र…

