दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज व उद्धव यांची टाळी वाजेल,असे वाटत नाही…
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आपल्या देशासमोर असलेले अनेक विषय विस्मरणात गेले.महागाई,बेरोजगारी,
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्यात धोरण व त्याचे होणारे संभाव्य परिणाम,इ.महत्वाच्या प्रश्नाचा त्यामध्ये समावेश आहे.या सर्व प्रश्नासोबत आणखी एक महत्वाचा राजकीय प्रश्नाचा त्यामध्ये समावेश आहे.तो म्हणजे राज व उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे,होय.ही चर्चा देखील आता मागे पडली आहे.हे दोघे भाऊ सध्या परदेश दौऱ्यावर आहेत.मे च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे दोघेही मुंबईत परतणार आहेत.त्यानंतर हे दोघे भाऊ एकमेकांना टाळी देतात का ? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राज यांनी पक्ष सोडताना ” माझा वाद विठ्ठलासोबत नाही तर त्यांच्या अवतीभवती असलेल्या बडव्याशी आहे,” असे सांगत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते.उद्धव ठाकरे यांच्या दबावाच्या राजकारणाला कंटाळून राज यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी दिली होती.गेल्या दीड दशकात या दोघांमध्ये निर्माण झालेली दरी सतत रुंदावत गेली.२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज यांनी उद्धव यांना हाक मारली होती,पण उद्धव यांनी त्यांच्या हाकेला ओ देण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्यानंतर २०१७ मध्ये उद्धव यांनी राज यांचे काही नगरसेवक फोडले.त्यामुळे राज त्यावेळी प्रचंड संतापले होते.त्यानंतर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने या दोघांनाही अस्मान दाखवले.आता हे दोघे भाऊ मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येऊ पाहत आहेत.पण हे खरे कारण नाही,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढता प्रभाव,हे खरे कारण आहे.हिंदूंची एकगठ्ठा मते खेचून घेण्यात मोदी यशस्वी झाल्यामुळे भविष्यात आपल्या हातून हिंदुकार्ड निसटेल,अशा भितीतून एकमेकांना टाळी देण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.मोदी यांचा वाढता प्रभाव व त्यांना हिंदू व्होट बँकेची मिळणारी साथ,अशा दोन कारणामुळे या दोघांनी आपल्यामधील मतभेद व तंटे यास मूठमाती देण्याचे ठरवले असावे.पण एकत्र येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी काही अटी घातल्या आहेत.त्यामध्ये सर्वात महत्वाची अट आहे,राज यांनी भविष्यात भाजपशी कधीही चुंबाचुंबी करू नये.ती अट राज ठाकरे मान्य करतील,असे वाटत नाही.कारण,गेल्या दीड दशकाच्या वाटचालीत राज ठाकरे यांनी भाजपच्या बाबतीत वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या.गेल्या पंधरा वर्षात उद्धव ठाकरे यांनीही भाजपला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.पण त्यांना प्रत्येकवेळी बॅकफूटवर जावे लागले.आपल्या पक्षाला मुख्यामंतत्रीपद मिळत नसल्याचे पाहून चार वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली.ज्या बाळासाहेबानी आणीबाणीनंतरच्या काळात काँग्रेससोबत दोन हात केले, त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांनी संगत करत मुख्यमंत्रीपद मिळवले.त्यांनी केलेली ही खेळी त्यांच्या चांगलीच अंगलट आली व पक्षात दुसरी फूट पडली.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार बाहेर पडले व उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. या सर्व पार्श्वभूमीवर हे दोघे भाऊ पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत.पण दुभंगलेली मने पुन्हा जुळून येत नाहीत.असा आपला इतिहास आहे.त्यामुळे या दोघांची टाळी जोराने वाजेल, असे वाटत नाही.

