दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
पहलगाम दहशतवादी हल्ला ; संवेदनशील प्रश्नाचा इव्हेन्ट होता कामा नये…
काश्मीरच्या पहलगाम येथे घडलेल्या घटनेला आज आठ दिवस होत आले.पण आपल्या वृत्तवाहिन्यानी गेले आठ दिवस त्या घटनेचे पुराण २४ × ७ या न्यायाने दिवसरात्र चालवले.” पाकिस्तान घाबरला,त्यांचा लष्करप्रमुख बंकरमध्ये लपला,पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे कुटुंब परदेशात रवाना,पाक सैन्यात राजीनामा सत्र सुरू,सुमारे ४ हजार पाक सैनिकांनी युद्धाच्या भितीने राजीनामे दिले,पाकचे धाबे दणाणले,अशा आशयाच्या बातम्या दिवसभर चालवल्या.तर दुसरीकडे पाक सैन्याने अनेक भारतीय चौकीवर तुफान गोळीबार सुरू केला असून त्यास भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिल्याच्या बातम्याही त्यांनी आपल्याला ऐकवल्या.या वृत्तवाहिन्यांनी पाकिस्तानने युद्धाचा धसका घेतल्याच्या बातम्यांचा अक्षरशः भडिमार केला.हा देखील एकप्रकारचा इव्हेंटच होता.त्यांना तो कोणी चालवायला लावला,हे तुम्हाला-आम्हाला कोणी सांगायला नको.आजही तेच चालू आहे.या घटनेने वृत्तवाहिन्यांना पुरेसे खाद्य मिळाले व त्यांनी ते गेले आठ दिवस स्वतःला पुरवले.” सिंधू जल पाण्याचा ” इव्हेंटचा पहिला एपिसोड संपल्यानंतर ” पाकिस्तान घाबरला,” हा लगोलग दुसरा इव्हेंट सुरू झाला.या इव्हेंटवर दोन दिवस खर्ची पडल्यानंतर ” भारत – पाक संरक्षण क्षमता,” हा तिसरा इव्हेंट सुरू झाला आहे.या इव्हेंटमध्ये दोन्ही देशांच्या संरक्षण क्षमतेची तूलना करण्यात आली.पाकिस्तानची जर युद्धाच्या भितीने घाबरगुंडी उडाली असेल तर तो आपल्या चौकीवर गोळीबार कसा करतो ? या प्रश्नाचे उत्तर संरक्षण मंत्रालयाने द्यायला हवे.जनतेची दिशाभूल करून या महत्वाच्या प्रश्नाकडे जनतेचे दुर्लक्ष होईल,अशा भ्रमात जर सरकार असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत,असंच म्हणावं लागेल. तसेच राज्यातील पाक नागरिक बेपत्ता झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले आहे.या संवेदनशील प्रश्नी केंद्र व राज्यसरकार फारसे गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे.सरकार व वृत्तवाहिन्यांनी या मानवनिर्मित आपत्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.तरच ज्या महिलांनी आपले कुंकू गमावले आहे,त्यांना आपण न्याय मिळवून देऊ शकू,अन्यथा ” ये रे माझ्या मागल्या,” असंच होत राहणार….

