दीपक मोहिते,
” नियती खरंच श्रेष्ठ आहे, ”
सहा वर्षांपूर्वी रंगलेला ” रात्रीचा खेळ चाले,” चा प्रयोग आजही नालासोपारावासियांच्या आठवणीत आहे,
आजच्या दिवशी बरोबर सहा वर्षांपूर्वी मध्यरात्री नालासोपारावासीय गाढ झोपेत असताना,शहराच्या मध्यवर्ती भागात काही राजकीय व्यक्ती वेगळ्याच कामात गुंतल्या होत्या.ही मंडळी त्यावेळी ” रात्रीचा खेळ चाले,” या अदभुत प्रयोगाला अंजाम देत होते.याचा सुगावा लागताच,सर्वत्र एकच गदारोळ उठला.त्यावेळी तेथे असलेल्या गाडीत नक्की काय आहे ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.सोशल मीडियावर क्षणार्धात या उपदव्यापाची व्हीडीओ क्लिप वायरल झाली व नक्की काय प्रकार सुरू होता,याचा मतदारांना उलगडा झाला.
वसईच्या नसलेल्या गुंडगिरीवर भरभरून बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकसंघ सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यावेळी अतिउत्साही स्वकीयांनीच तोंडघशी पाडण्याचे काम केले होते.सेनेचे आ.रविंद्र फाटक यांच्या गाडीतून भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नोटांची बंडले जप्त केली होती.नेमके काय घडत होते,याचा अंदाज नालासोपारावासीयाना आला.रंगेहाथ सापडल्यामुळे त्यांचा संताप होणे,साहजिकच होते.परंतु पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांची वागण्याची तऱ्हा लक्षात घेता,ही कपटी माणसे निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात,हे त्यावेळी तमाम नालासोपरावासीयांना अनुभवायला मिळाले.” एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोटे,” आपल्या दिशेने असतात,याचा त्यांना यापुढे विसर पडता कामा नये.पुढे मागे पुन्हा सोपाऱ्यात आलात तर निदान भुई धोपटण्याचे काम तरी करू नका,एवढीच नालासोपारावासीयांची अपेक्षा होती.पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत याच शहरात एका हॉटेलमध्ये सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा दुसरा अंक पाहायला मिळाला.त्यावरून आपल्या राजकारणाची किती अधोगती झाली आहे,हे स्पष्ट झाले.जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून शेखी मिरवणारा भाजप सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो,हे पावलोपावली अनुभवायला मिळत आहे.
२०१९ च्या निवडणूक प्रचारामध्ये आ.हितेंद्र ठाकूर यांच्यावर तोंडसुख घेत भाजप व एकसंघ शिवसेनेने टाळ्या जरूर घेतल्या,पण प्रत्यक्षात घडले वेगळेच.मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा निषेध करावा,तेवढा थोडाच….पण या घटनेतून उद्धव ठाकरे यांनी मात्र चांगलाच बोध घेतला असावा.आपण त्यावेळी जे काही केले,ते बुमरँग होऊन आपल्यावर उलटेल,असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नसेल.पण आता बाजू बदलल्या गेल्या आहेत.कालपर्यंत गळ्यात गळा घालून फिरणारे आता एकमेकांचे कट्टर दुश्मन झाले असून आता एकमेकांच्या उरावर बसत आहेत.नियती कधीच कोणाला सोडत नाही.प्रत्येकाची एक वेळ येत असते. ” वसईतील गुंडगिरी,” हे दोन शब्द यांच्यासाठी परवलीचे शब्द होते,परंतु सहा वर्षांपूर्वी ” तुमचीही अशी गुंडगिरी,” हे तीन शब्द आम्हा नालासोपारावासीयांसाठी परवलीचे ठरले आहेत.
” जो बुंदसे गयी,वह हौदसे नही आती,” त्यामुळे निदान आता तरी अशी कपट कारस्थाने करू नका.आज ना उद्या एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन्ही गटांना देखील या बूमरँगचा अनुभव घ्यावा लागणार आहे.कारण नियती कधीच कोणाला सोडत नसते, हेच खरं…

