सुगंध जोशी,बोरिवली,
गोखले हायस्कूलच्या चैतन्य उन्हाळी शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,
बोरिवली येथील नामदार गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्क यांच्या सहकार्याने तीन दिवसीय चैतन्य उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्याच्या बौद्धिक मानसिक व शारीरिक व कलागुणांचा विकास अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून २८ ते ३० एप्रिल या तीन दिवसाच्या चैतन्य उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त योगासने,श्वसनतंत्र, बुद्धिबळ,हस्तकला व नृत्यकला यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉ.सुहासिनी संत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,सध्या परीक्षा संपलेल्या आहेत, त्यामुळे भयमुक्त व तणावविरहित वातावरणात प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. सुदृढ शरीर व कलेचा दैनंदिन जीवनात वापर करून जीवन आनंददायी करावे.योग साधनेच्या नियमित सरावाने आपली एकाग्रता वृद्धिंगत करावी.याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्कचे अध्यक्ष सुरेश
नायडू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेत आपले व्यक्तिमत्व अधिकाधिक विकसित करावे,असे आवाहन केले.
या शिबिरात बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका प्रीती देशमुख व देवव्रत देशमुख, योगासन प्रशिक्षणासाठी फिजिओथेरपिस्ट डॉ.विशाल जाधव व डॉ.किंजल जाधव, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मनीषा कुबल – शहा,कोरिओग्राफर आराधना व रो.राजेश म्हात्रे, रो.प्रीती खानविलकर रो.मनीषा शहा,रो.गिरीश वायगणकर,रो.संजय तारी,रो. अमोल कारेकर हे रोटरी क्लबचे सदस्य व शाळेचे अधीक्षक विराज संखे उपस्थित होते.शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक करताना शाळेचे प्राचार्य अवधूत गावड यांनी शाळा हे ज्ञानाचे भांडार असून विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापनासोबतच विविध शालेय उपक्रम राबवण्यात येत असतात.तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञानाचे भांडार खुले करून देण्याचा प्रयत्न सातत्याने शाळेकडून केला जातो.तेच उद्दिष्ट चैतन्य शिबिराच्या आयोजनाचे आहे. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व दैनंदिन जीवनात उपयुक्त असे ज्ञान खुले होणार आहे.त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे सांगितले.या शिबिरात शाळेतील सर्व शिक्षक सहभागी झाले होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका वैशाली राऊत व आभार प्रदर्शन मीना खरात यांनी केले.

