दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजपमध्ये भाटांची भाऊगर्दी…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अधून मधून बऱ्यापैकी विनोद करत असतात.त्यांच्या या विनोदाला किती दर्जा असतो,हा वादाचा मुद्दा असला तरी त्यांचे हे गुऱ्हाळ अधून मधून चालुच असते.काल त्यांनी २०३४ पर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील,अशी भविष्यवाणी करून टाकली.त्यांच्या या भाटगिरी करण्याच्या स्वभावाला अनुसरून त्यांनी हे वक्तव्य केले आहे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता होऊ लागली आहे.गेल्या निवडणुकी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व पंकजा मुंडे यांना पावलोपावली डावलले होते. विधानसभा व विधान परिषदेच्या उमेदवारीपासून वंचित ठेवले होते,त्या फडणवीसांचा ” फडणवीस चालीसा,” पठण करण्यात बावनकुळे,नितेश राणे व नवनीत राणा,हे तिघे सतत आघाडीवर असतात.नितेश राणे यांनी तर आपल्या भाषणात ” काय वाटेल ते करा,आपल्याला वाचवण्यासाठी आपला बाप ” सागर, ” बंगल्यावर बसला आहे,” असे जाहीर वक्तव्य करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.देवेंद्र फडणवीस यांनी भूतकाळात जमा होण्याच्या मार्गांवर असलेल्या राणे कुटुंबाला पुन्हा संजीवनी मिळवून दिली. त्यामुळे राणे यांचे हे चिरंजीव अधून मधून त्या उपकाराची उतराई करण्याच्या प्रयत्नात असतात.गेल्या अकरा वर्षात राजकारणाची किती अधोगती झाली आहे,ते या सर्व घटनांवरून पाहायला मिळते.आज चंद्रशेखर बावनकुळे पुढील दहा वर्षात काय घडणार ? हे आतापासूनच सांगू लागले आहेत.मुख्यमंत्रीपद परत आपल्याला मिळावे,यासाठी देव पाण्यात टाकून बसलेल्या एकनाथ शिंदे यांना बावनकुळे यांच्या मुखातून वैधानिक इशारा देण्यात आला आहे.बावनकुळे यांनी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तळी उचलण्याचे काम नित्यनेमाने सुरू केले आहे.त्यांनी केलेल्या या वक्तव्यात गर्भित अर्थ दडला आहे.सध्या जे काही पदरात पडले आहे,त्यामध्ये समाधान माना,असे भाजपने या त्यांच्या वक्तव्यातून एकनाथ शिंदे यांना बजावले आहे.चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे हे दोघेही ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात,गेल्या टर्ममध्ये या दोघासह फडणवीस कंपूने एकनाथ खडसे या तिघांची गठडी वळली होती.आता तशीच गठडी एकनाथ शिंदे यांची वळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.२०३४ पर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीसच राहतील,या त्यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी ” शुभेच्छा,” असे एका शब्दात उत्तर देत हात जोडले.
मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच असायला हवे,यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो,हे एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघा नेत्यांना ठाऊक आहे.त्यामुळे अजित पवार,हे मिळालेले दूध डोळे मिटून पिण्याच्या भूमिकेत आहेत.चुलीवरच्या दुधाकडे लक्ष दिल्यास दिल्लीत बसलेला बोका सगळं दूधच फस्त करेल,हे अजित पवार याना माहित आहे.पण मुख्यमंत्रीपदाची चटक लागलेल्या एकनाथ शिंदे मात्र शक्य नसतानाही चुलीवरच्या दुधाच्या पातेल्यावर लक्ष ठेवून आहेत.
Trending
- बलाढ्य अमेरिकेला अखेर गुडघे टेकावे लागले……
- इस्त्रायलच्या हेकेखोरपणामुळे युद्धविराम दृष्टिक्षेपात नाही…
- पक्षांतरबंदी कायदा ; कायद्यातील परिच्छेद ४ चा पुनर्विचार होणे गरजेचे….
- युद्धविराम ; जगाचा जीव भांड्यात पडला..
- शिक्षक घरी येणार ; विद्यार्थ्यांना ऍडमिशन करून देणार, सरकारचे डोकं फिरलंय
- पुरोगामी राज्य अशी ओळख असलेले राज्य आता वेगळ्या वळणावर,
- अखेर अमेरिका गुडघ्यावर आली, ट्रम्पवर अमेरिकन जनतेचा वाढता दबाव,
- धोकादायक रेल्वेप्रवास ; कायमस्वरूपी तोडगा हवा,

