दीपक मोहिते
” निर्लज्जपणा, ”
शिंदे यांनी म्हस्के यांना वेळीच आवरावे,अन्यथा पक्ष अडचणीत येण्याची शक्यता,
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खा.नरेश म्हस्के हे वादग्रस्त नेते म्हणून ओळखले जातात. काश्मीर येथे घडलेल्या घटनेनंतर वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.मस्के हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून या-ना त्या कारणावरून वादात सापडत असतात. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या नागरिकाविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले व पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदत करणे,ही राज्य सरकारची जबाबदारी असताना,अशा प्रकारचे वक्तव्य करणे,हे अपमानास्पद आणि असंवेदनशील मानले जात आहे.ते काय म्हणाले,ते पहा,आयुष्यात कधीही विमानात न बसलेल्या पर्यटकांना शिंदे यांच्यामुळे विमानातून प्रवास करता आला.हे त्यांचे वाक्य पर्यटकांच्या जिव्हारी लागणारे होते.
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.या घटनेनंतर राज्यातील महायुती सरकारने जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसाठी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला.या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये गेले.त्यांनी तेथे अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळवून दिला.त्यासॊबत दोन विमानांमधून १८० हून अधिक पर्यटकांना त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणले.
अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाच्या या खासदाराने अडकलेल्या पर्यटकांबाबत अकलेचे तारे तोंडले.त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या नागरिकामध्ये ४५ लोक वर्धा आणि नागपूरचे आहेत,जे तेथे रेल्वेने गेले होते.सीरआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते,ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते.त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली आहे,असे वादग्रस्त वक्तव्य वाचाळवीर म्हणून ओळख असलेल्या खा.नरेश म्हस्के यांनी केले आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
गरज नसताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काश्मीरवारी केली. त्यानंतर त्यांनी कशी मदत केली,याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खा.नरेश मस्के पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केले,अशी भाषा कसे करतात ? अशा शब्दात महायुतीच्या कारभारावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील त्यांनी केलेले हे वक्तव्य अत्यंत उद्धट आणि सामान्य जनतेचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे.लोक अडचणीत असताना त्यांच्यावर उपकार केल्यासारखं बोलणं,हे अशोभनीय आहे,असे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
राज्य सरकारची जबाबदारी लक्षात घेऊन,मदतीला ” उपकार,” म्हणणे हे लोकशाहीच्या मूळ मूल्यांच्या विरोधी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून काही नेत्यांनी म्हस्के यांचे वक्तव्य व्यक्तिगत मत असल्याचे सांगत पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
खा.नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. जनतेने त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मस्के यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर नागरिकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.अनेकांनी ट्विटर,फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ” नेते जनतेची सेवा करताना उपकार केल्यासारखे का बोलतात ? ” असा सवाल उपस्थित केला आहे.काही जणांनी तर ” लोकशाहीत मदत ही जबाबदारी असते,उपकार नव्हे,” असे स्पष्टपणे नमूद केले आहे.त्यामुळे येत्या काळात या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.अशा वक्तव्यांमुळे लोकांमध्ये असंतोष वाढू शकतो आणि राजकीय नेतृत्वाच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो.त्यामुळे वादग्रस्त विधाने करणाऱ्यावर आवर घालण्याची गरज आहे.
खा.नरेश म्हस्के यांचे आजवरचे वागणे,हे कायम वादग्रस्त राहिलेलं आहे.त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास पक्षातील तसेच ठाणे भाजपचा कडाडून विरोध होता.पण एकनाथ शिंदे हे सेनेतून बाहेर पडताना म्हस्के सोबत राहिल्यामुळे त्यांना खासदारकीची लॉटरी लागली.प्रशासकीय कामकाजातही ते अपयशी ठरले आहेत.शिंदे यांच्या पायाशी निष्ठा वाहिल्यामुळे त्यांना अनपेक्षितपणे संधी मिळाली.पण त्यांना वेळीच आवरले नाही तर शिंदे यांना गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून खडे बोल ऐकावे लागतील.

