दीपक मोहिते,
ठाकरे भाऊ एकत्र येणार का ?
जनतेच्या प्रतिक्रिया –
दोन दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांची युट्युब चॅनेलवर दिलखुलास अशी मुलाखत घेतली.या मुलाखतीनंतर एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली.या मुलाखाती दरम्यान राज ठाकरे यांनी मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ” काही अटी व शर्तीवर आम्ही दोघे एकत्र येऊ शकतो, ” असे सांगितले.त्यामुळे राजकीय वातावरण तापले. चॅनेल्सनी दिवसभर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली,तो धुमाकूळ अद्याप तसाच सुरु आहे.अनेक राजकीय विश्लेषकानी आपली मते मांडली.या सर्व गदारोळात ” news 27.in media,” या वेबपोर्टलने प्रत्यक्ष मतदारांना काय वाटते ? या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा संपूर्ण गोषवारा जसाच्या तसा आम्ही प्रसिद्ध करत आहोत.
प्रतिक्रिया –
१ ) मनिषा शिंदे,वसई
संचालिका,राष्ट्र जागृती विचार मंच,मुंबई,
राजकारणात काहीही होऊ शकते,हेच खरं म्हणावे लागेल. त्यांचे एकत्र येणं,मराठी माणसाला न पटणारे आहे.या दोघा ठाकरे बंधूनी मराठी अस्मितेला केंव्हाच वाऱ्यावर सोडले आहे.भाजपने हिंदुत्वाच्या ज्वलंत मुद्यावर या दोघा भावांच्या चांगल्याच मुसक्या बांधल्या असुन आता हे दोघे एकत्र आले तरी राज्याच्या राजकारणात काही फरक पडणार नाही.कारण,लोकांचा त्यांच्यावर बिलकुल विश्वास उरलेला नाही.
२ ) केदार अनुभवणे,आर्थिक सल्लागार,ऑर्चीड फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट्स,पालघर,
खूप वर्षाने एका नवीन विषयाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.राज ठाकरे यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरे प्रतिसाद देतील,असे वाटत नाही.कारण राज यांनी घरातील मतभेदावर अनेकदा जाहीरपणे वक्तव्ये केली. तसेच ईडीच्या भितीने राज ठाकरे हे आपली भूमिका वारंवार बदलत राहीले.त्यांनी सेनेला सोडचिट्ठी दिल्यानंतर पक्षसंघटनेवर चांगलाच परिणाम झाला.उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी महायुतीला छुपा पाठिंबा दिला.त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या टाळीला टाळी देतील, अशी शक्यता वाटत नाही. तसेच परप्रांतीयांच्या प्रश्नावर असलेला राज ठाकरे यांचा दृष्टिकोन उद्धव ठाकरे यांना परवडणारा नाही.त्यामुळे उद्धव ठाकरे हे ” तुझी संगत नको रे बाबा, ” असे म्हणत राज ठाकरेपासून दोन हात लांब राहतील,असे वाटते.
३ ) जयंतीलाल शहा,डहाणू, व्यापारी,
या दोघानी एकत्र यावे,असे तुम्हा-आम्हाला वाटत असले तरी ते शक्य नाही.कारण या दोघांना मोठ्याप्रमाणात इगो आहे.या इगोतूनच शिवसेना फुटली.राज यांच्या मनसेपेक्षा उद्धव यांच्या शिवसेनेला बऱ्यापैकी जनाधार आहे.तसा तो राज यांच्या मनसेकडे नाही.त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज यांना टाळी देतील,असे वाटत नाही.तशी ती त्यांनी दिली तरी ती जास्त काळ टिकून राहील,असे वाटत नाही.
४ ) संगीता दिवेकर,वाडा
नोकरदार महिला,बालाजी इंटरप्रायझेस,ठाणे,
या दोघा भावानी मराठी व हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र यायलाच हवे.आज मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी एक राजकीय पक्ष देव पाण्यात टाकून बसला आहे.मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाना हुसकावून लावणाऱ्या पिल्लावळी वाढत चालल्या आहेत.त्यांना पायबंद घालण्यासाठी या दोघा भावांनी एकत्र येणे,ही काळाची गरज आहे.त्यामुळे हे दोघेजण एकत्र आले तर स्वागतच आहे.
५ ) शरद सातपुते,जव्हार,
वास्तूविशारद,
दोघांनी एकत्र आले पाहिजे, पण त्यामध्ये प्रामाणिकपणा व पारदर्शकता असायला हवी. तरच मूळ उद्देश सफल होऊ शकतो.कारण सत्तेसाठी हपापलेला भाजप हा लहान पक्ष गिळंकृत करण्यासाठी आसूसलेला आहे.या दोघांच्या एकत्र येण्यामुळे भाजप तसे धाडस करणार नाही.जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर मराठी माणूस पेटून उठेल. त्यामुळे या दोघांनी मराठी माणसाच्या हितासाठी आपला मान – अपमान बाजूला सारून एकत्र आले पाहिजे.
६ ) रोहिणी जाधव,लघुउद्योजिका,
विक्रमगड,
मराठी अस्मितेशी कोणतेही देणेघेणे नसलेल्या भाजपला त्याची जागा दाखवण्यासाठी उद्धव व राज या दोघा भावांनी एकत्र आलेच पाहिजे.कारण शहरी भागात मराठी टक्क्याची घसरण सुरु झाली आहे.मुंबई केंद्रशासित करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.त्यासाठी तीन वर्षांपूर्वी भाजपने शिंदे यांना हाताशी धरून त्यानी शिवसेना फोडली,अनेक उद्योगधंदे इतर राज्यात नेले.मुंबई ऐवजी अहमदाबाद शहराला आर्थिक राजधानी बनवण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. तो हाणून पाडण्यासाठी या दोघा भावांनी एकत्र येणे,ही काळाची गरज आहे.
७ ) सुदर्शन वांगड,तलासरी
शेतकरी,
दोघे भाऊ एकत्र आल्यास भाजपला चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो.आमच्या तलासरी भागात शेजारच्या गुजरात राज्याची घुसखोरी होत असुन,त्या राज्याचे सरकार त्यास खतपाणी घालत आहे.आपल्या हद्दीत लागून असलेल्या त्यांच्या ग्रामपंचायती आपले फलक लावत आहेत.त्यांना कोणाचीही भिती वाटत नाही. त्यासाठी या दोघा भावांनी एकत्र यायला हवे.
८ ) सुनील पागधरे,कळवा,
विक्रेता,
या दोघा भावांनी एकत्र आले पाहिजे,असे प्रत्येक मराठी माणसाला वाटते.पण ते एकत्र येतील,असे वाटत नाही.कारण या दोघांनाही असलेला प्रचंड इगो,त्यांना एकत्र येऊ देणार नाही.या इगोनेच या दोघांचा आजवर घात केला.त्यामुळे हे दोघे एकत्र येती,असे वाटत नाही.
९ ) अनिता क्षीरसागर,ब्युटी पार्लर मालक,सांताक्रुज,मुंबई,
तमाम मराठी माणसाच्या इच्छेला मान देऊन या दोघा भावांनी एकत्र यायला हवे. त्यांचे एकत्र येणे,तात्पुरत्या स्वरूपात नसावे.त्यानी एकत्र आल्यानंतर भाजपला रोखण्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम ( किमान समान कार्यक्रम ) आखला पाहिजे.कारण त्याची हल्ली नितांत गरज आहे.

