दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
राजला टाळी दिल्यास ती उद्धव ठाकरे यांची घोडचूक ठरेल…
शिवसेनेने गेल्या पाच दशकात अनेक चढउतार पाहिले. आजवर अनेक फुटीचे प्रसंग अनुभवले.छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे पहिल्या फळीतले नेते शिवसेनेला सोडून गेले.काही काळ पक्षात चलबिचल निर्माण झाली.पण या अशा संकटातून पक्ष प्रत्येकवेळी सावरला गेला.काही वर्षांपूर्वी राज यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत स्वतःचा पक्ष स्थापन केला.तेंव्हा राजकीय विश्लेषकानी बाळासाहेबांची शिवसेना संपल्याची हाकाटी सुरु केली.पण उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख या नात्याने पक्षाची धुरा समर्थपणे पेलली.तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली,त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची नक्की शिवसेना कोणती असा वाद उभा ठाकला.मात्र त्या संकटातून उद्धव ठाकरे व संजय राऊत या दोघांनी पक्षाला बाहेर काढले.मात्र दीड दशकापूर्वी राज ठाकरे यांच्या बंडामुळे पक्षाच्या विस्तारीकरण धोरणावर चांगलाच परिणाम जाणवला.अनेकदा हे दोघे भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय क्षेत्र व मीडियात रंगल्या,पण त्या केवळ चर्चाच ठरल्या.आता प्रथमच या दोन्ही नेत्यांनी याविषयी उघड भाष्य केलं आहे.त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का ? आले तर युती करणार की एकाच संघटनेत राहणार ? अशी चर्चा सूरू झाली आहे.तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करणार का ? असे प्रश्न,विचारण्यात येत आहेत.कारण गेल्या गेल्या १९ वर्षात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. भाजपने या दोन्ही नेत्यांच्या पक्षाची प्रचंड नुकसान केले आहे.उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकनाथ शिंदे गटाला गळाला लावल्यामुळे पक्ष क्षीण झाला आहे.राज यांच्या मनसेच्या मर्यादा ओळखून त्यांची प्रत्येक निवडणुकीत कोंडी केली.भाजपने राज ठाकरे यांच्या मनसेला आजवर कधीच गृहीत धरून राजकारण केले नाही.त्यांनी मनसेकडे कायम ” न्यूसन्स वॅल्यू,” म्हणून पाहिले.
या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याच्या चर्चेला आज पुन्हा तोंड फुटायचं कारण म्हणजे दोन्ही नेत्यांनी केलेली वक्तव्ये होय.राज ठाकरे यांनी अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे शब्दाचा खेळ करत,ही मुलाखत दिली.
ते काय म्हणाले,ते पहा,” कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद,भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत,महाराष्ट्र फार मोठा आहे.या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी,मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत.याच्यामुळे एकत्र येणं व एकत्र राहाणं, यात फार काही कठीण गोष्ट आहे,असं मला वाटत नाही.
परंतु हा विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही.आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे आपण पाहिलं पाहिजे.मला तर वाटतं सगळ्या पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा,” या त्यांच्या बोलण्यामध्ये केवळ शब्दच्छल आहे.गेली १९ वर्षे राज यांना महाराष्ट्र कळला नाही,असे आपण समजायचे का ? त्यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले असले तरी ते अटी व शर्ती घालुन दिले आहेत.
राज पुढे म्हणतात,मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो.परंतु, एकीकडे त्यांना ( भाजपाला ) पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोडी करायच्या,सोयीनुसार विरोध करायचा,त्यांच्या या अशा धरसोड स्वभावामुळे लोक त्यांच्या पक्षाची ” सेटिंगबाज,” पक्ष अशी करतात.
राज ठाकरेंना पक्षाच्या स्थापनेच्या १९ वर्षांनंतरही सत्तेचा मार्ग का गवसला नाही. याविषयी त्यांनी सर्वप्रथम आत्मचिंतन करायला हवे.
शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मराठी अस्मितेला फुंकर घालत जे काही मुद्दे हाताळले,मनसेनेही मराठीचा मुद्दा,मराठी पाट्यांचा मुद्दा वगैरे मुद्दे घेत थोडेफार यशही मिळवलं.२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीत मनसेचा सेना-भाजपा युतीला फटका बसला होता.पण त्यांना सातत्य टिकवून धरता आले नाही.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा अक्षरशः पालापाचोळा झाला. त्यांच्या पक्षाने दीडशेहून अधिक जागा लढवल्या,पण त्यांची पाटी कोरीच राहिली.सुमारे साठ टक्के उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.
त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना टाळी देतील,असे वाटत नाही. आणि समजा त्यांनी टाळी दिली तर उद्धव ठाकरे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत,असे समजायला हरकत नाही.कारण मनसेला सोबत घेतल्यामुळे गुजराती, मारवाडी,उत्तर भारतीय व दक्षिणात्य समाज,उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता आहे. मुंबई,ठाणे,पुणे,
छ.संभाजीनगर,पिंपरी – चिंचवड व अन्य शहराच्या महानगरपालिका निवडणुकाध्ये ते उद्धव ठाकरे यांना परवडणारे नाही.
कालांतराने मराठीच्या मुद्द्यासोबत राज ठाकरे यांनी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला.बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे भगवी शाल पांघरून ते वावरू लागले.पण भगवी शालही त्यांच्या मदतीला धावून आली नाही.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांची मुले उभे होते.दोघांचे मतदारसंघही शेजारीशेजारी होते.वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे यांनी कडवे आव्हान दिलं होतं.मात्र त्यात आदित्य विजयी झाले.तर माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना शिवसेना उबाठा गटाच्या महेश सावंत यांनी पराभूत केलं.अशा सर्व पारिस्थितीमध्ये
हे नेते पुन्हा एकत्र येणार का ? यावर आता चर्चा सुरु झाली आहे.भाजप देखील ” वेट अँड वॉच,” च्या भूमिकेत आहे. ” शिवसेना,” हा शब्दच महाराष्ट्रातून संपवायला निघालेला भाजप,या दोघा भावांना एकत्र येऊ देईल,असे वाटत नाही.समजा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टाळी दिली तर मात्र ती टाळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी घोडचूक ठरू शकते.

