दीपक मोहिते,
काहीही हं…
शिंदे गटाचा १०० % कपाळमोक्ष होणार…
राजकारणात कधी काय होईल,याचा नेम नाही.कालचे शत्रू हे आज गळ्यात गळा घालताना पाहायला मिळतात.राजकारणात सोयीनुसार वागावे लागते,हेच खरं.या अशाच सोयीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवतीर्थावर नुकतेच दाखल झाले होते.शिंदे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.त्याचवेळी सदा सरवणकर हे गालातल्या गालात हसत होते.
मुंबई व ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ऐतिहासिक भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.राज ठाकरे यांच्या आडमुठे धोरणामुळे शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना घरी बसावे लागले.या घटनेची उपमुख्यमंत्री शिंदे यांना अवघ्या चार महिन्यात विसर पडावा,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.त्यांचे माजी आ.राजू पाटील यांनी या भेटीवर आपली जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.ते काय म्हणाले ते पहा जरा,ते म्हणाले,” दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो.” वरवर त्यांचे हे वक्तव्य भिडे गुरुजीना कुत्रीने चावा घेतल्याप्रकरणी आहे,असे वाटत असले तरी तसे ते नाही.त्यांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा.श्रीकांत शिंदे यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. त्यामुळे अत्यंत उद्दिग्न होऊन त्यांनी हे वक्तव्य केले.राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या आणि मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या एका राजकीय नेत्यांवर अशाप्रकारची नामुष्की येते,ही आपल्या राजकारणाची अधोगतीच म्हणावे लागेल.राजू पाटील यांची ही आगपाखड योग्यच होती.माहीम विधानसभा मतदारसंघातही राज ठाकरे आपल्या पुत्रप्रेमापोटी ज्या पद्धतीने वागले,ती पद्धत मराठी मनाला पटली नाही.त्यांनी रबर तुटेपर्यंत ताणल्यामुळे मुलगा अमित ठाकरे व सदा सरवणकर हे दोघेही दणक्यात आपटले.तरीही शिंदे आता राज यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेले.” राजकारण व प्रेमात सारं काही क्षम्य असते,” असं म्हंटलं जातं.त्याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला.आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे सोबत युती करण्याच्या दिशेने शिंदे यांनी पहिले पाऊल टाकले आहे.पण या निवडणुकीत मनसेचा त्यांना किती फायदा होईल,हे सांगणे जरा कठीणच आहे.कारण राज यांच्या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भुमिकेमुळे त्यांनी जनाधार गमावला आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या मतदारांनी त्यांना साफ झिडकारले.सुमारे दीडशे जागा त्यांनी लढवल्या,पण त्यांची पाटी कोरी राहिली.आता भाजपने शिंदे यांना पुढे करून तिरकी चाल खेळली आहे.मनसेचे राजकारण हे ” परप्रांतीयांची मुंबईतुन हकालपट्टी,” यावर अवलंबून असल्यामुळे मनसेसोबत थेट युती करणे,आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे,हे भाजपच्या चाणाक्ष नेत्यांनी ओळखले असून त्यांनी शिंदे यांचे प्यादे पुढे केले आहे.मुंबई शहरातील उत्तर भारतीय व गुजराती
मतदारांची लोकसंख्या लक्षात घेऊन शिंदे यांना भाजपने कामाला लावले आहे.मात्र या खेळात शिंदे यांचा १०० % कपाळमोक्ष होणार आहे.

